गोध्रा हत्याकांडात सहभाग असल्याच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या संशयितास शनिवारी चौकशीसाठी धुळे येथे आणण्यात आले. इम्रान अहमद बटुक असे त्याचे नाव असून त्याने प्रारंभी सहा वर्षे धुळ्यात व नंतर मालेगावात बस्तान बसविले, अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी  गुजरात पोलिसांनी मालेगाव येथून बटुकला अटक केली होती. चौकशीत गोध्राकांडातील तो मुख्य संशयितांमधील एक असल्याचे निदर्शनास आल्यावर पथकाने बारीकसारीक बाबींची पडताळणी सुरू केली. गोध्राच्या घटनेनंतर संशयित धुळ्यात आश्रयाला होता. साधारणत: २००२ ते २००८ या काळात तो छुप्या पद्धतीने राहिला. याच दरम्यान त्याने एका मुलीशी विवाह करून संसार थाटल्याची माहिती पुढे आली. त्याची शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक धुळ्यात धडकले. या काळात त्याने भंगार दुकान आणि हॉटेलमध्ये काम केले. त्या ठिकाणी पथकाने चौकशी केली. संशयिताने महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे आधार कार्ड तयार करून घेतले. काही वर्षे धुळ्यात राहिल्यानंतर २००८ मध्ये तो मालेगाव येथे गेला. बटुक कोणाच्या संपर्कात होता, काय करत होता, त्याला भेटायला कोण येत होते अशा प्रश्नांची उकल तपास पथक करत आहे.