मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा या पाश्र्वभूमीवर शहर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त तैनात ठेवला. ठिकठिकाणी बंदोबस्त असतांना पोलिसांच्या नाकावर टिच्चून सोनसाखळी चोरटय़ांनी आपले हस्तकौशल्य पुन्हा एकदा नाशिककरांना दाखविले.

शहर परिसरात गणेशोत्सवाच्या अगोदरपासून सुरू असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा, तर गुरूवारी पंतप्रधान यांची जाहीर सभा असल्याने शहर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी सकाळी साडेसात वाजता मुंबई नाका परिसरात दीपालीनगरातील माधुरी रुंद्रे (६७) या फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीने आलेल्या दोघा तरूणांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. मंगळवारी सायंकाळीही इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासननगर भागात सोनसाखळी हिसकाविण्यात आली. अनिता शेलार (४०) या रस्त्यावरून पायी जात असतांना दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी शेलार यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.