क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडविण्याची भरपूर संधी आता उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंग्टा विद्यालयाच्या क्रीडा महोत्सव उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मंगेश पिंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे सचिव गजानन होडे, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, कार्यकारी मंडळाच्या सदस्या नेहा सोमठाणकर, मुख्याध्यापक अरुण गायकवाड, पर्यवेक्षिका माधुरी देशपांडे, अरुण पैठणकर आदी उपस्थित होते. क्रीडा महोत्सवात पहिल्या दिवशी सांघिक, तर दुसऱ्या दिवशी वैयक्तिक खेळ झाले. वैयक्तिक स्पर्धामध्ये विविध गटांत ५० मीटर धावण्यात वैभव शिरसाट, गणेश संभारे, समर्थ भंडारे, गोळाफेकमध्ये सुदर्शन बोरनारे, रोशन हेंबाडे, कॅरममध्ये रोशन खैरनार, मंगेश वाघात, भूषण भटाटे यांनी सर्वप्रथम क्रमांक मिळविला.

सारडा कन्या शाळेचा क्रीडा महोत्सव

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आरोग्याची काळजी घेताना खेळ, व्यायाम यास प्राधान्य देण्याचे आवाहन सबनीस यांनी केले. पालकांनीही त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष य. दा. जोशी होते. व्यासपीठावर क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, उपमुख्याध्यापिका मृदुला शुक्ल, अनुराधा अहिरे, रश्मी सराफ आदी उपस्थित होते.

क्रीडा सप्ताह अहवाल उल्हास कुलकर्णी यांनी सादर केला. या वेळी ९८ विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. विद्यार्थिनींनी रोप मल्लखांब व जिम्नॅस्टिकचे विविध प्रकार या वेळी सादर केले. सूत्रसंचालन पुंडलिक शेंडे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका सुनंदा जगताप यांनी मानले.