मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यासंदर्भात कायदेशीर कारवाईसाठी प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारदाराकडून २०० रुपयांची लाच वॉर्डबॉयमार्फत स्वीकारणाऱ्या रुग्णालयातील ईसीजी तंत्रज्ञास गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.

तक्रारदार हे पत्नीसह १ मार्च रोजी सासूरवाडीस गेले असता त्यांचे सासरकडील मंडळींबरोबर वाद झाले. तक्रारदार व त्यांच्या पत्नीस सासरकडील मंडळींनी मारहाण केली. जखमी झाल्याने तक्रारदारास मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या संदर्भातील प्रमाणपत्राची मागणी तक्रारदाराने केली असता ईसीजी तंत्रज्ञ नीलेश दिगंबर टापसे याने २०० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने त्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यानंतर रचण्यात आलेल्या सापळ्यात टापसे अडकला. गुरुवारी दुपारी पावणेपाच वाजता मालेगावच्या शासकीय रुग्णालयात तक्रारदाराकडून वॉर्डबॉय सुनील दगा कांदळकर याच्यामार्फत २०० रुपये घेत असताना दोघांना पथकाने ताब्यात घेतले.