नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता शुक्रवारी जिल्ह्यातील १३६ मतदान केंद्रावर मतदान होणार असून आज दादासाहेब गायकवाड सभागृह येथून मतदान साहित्यासह मतदान केंद्र पथक रवाना झाले.

निवडणूक निरीक्षक आर.जे. कुलकर्णी आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मतदान साहित्य वितरणाची पाहणी केली. मतदान मुक्त आणि नि:पक्षपातीपणे होईल यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना कुलकर्णी यांनी केली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी परस्पर समन्वयाने काम करून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन केले. निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती रँडमायझेशन पद्धतीने करण्यात आली असून त्यांना जबाबदारी सोपविण्यात आलेल्या मतदान केंद्राची माहिती साहित्य वाटपाच्यावेळी देण्यात आली. मतदान कर्मचारी आणि साहित्य मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी २७ बसेस आणि २५ जीपची सोय करण्यात आली. बागलाण, निफाड आणि मालेगाव तालुक्यासाठी गरजेनुसार अधिक कर्मचारी वर्ग देण्यात आला आहे. साहित्य वितरणापूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी सरीता नरके, तहसीलदार गणेश राठोड, शरद घोरपडे यांनी साहित्य वाटप आणि जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली. दरम्यान मतदानासाठी मतदाराला ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, काँग्रेस आघाडीचे डॉ. तांबे आणि डाव्या आघाडीचे प्रकाश (राजू) देसले या तीन पक्षीय उमेदवारांसह एकूण १७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य सोमवारी मतमोजणीद्वारे निश्चित होईल. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ९६ हजार १३६ मतदार आहेत. मतदाराला पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. यावेळी मतपत्रिकेसोबत दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच मतदान करावे. इतर पेन, पेन्सिल, बॉल पेन वापरू नये. अन्यथा मतपत्रिका बाद होऊ शकते. मतदान पसंती क्रमांकानुसार असल्याने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर अंकी क्रमांक लिहून मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.