ग्रामपंचायत निवडणूक निकाल

प्रल्हाद बोरसे लोकसत्ता

मालेगाव : शिवसेनेला शह देण्यासाठी बहुसंख्य ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपशी युती करूनही कृषिमंत्री दादा भुसे यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र सोमवारी जाहीर झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून उघड होत आहे.

तालुक्यातील ९९ पैकी तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींमधील ७६१ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. त्यासाठी एकूण १६८४ उमेदवार रिंगणात होते. ग्रामपंचायत निवडणुका या थेट पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी गावातील हे सत्ताकेंद्र अप्रत्यक्षपणे आपापल्या पक्षाच्या कब्जात ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये मोठी चढाओढ होत असते. याशिवाय बऱ्याच ठिकाणी स्थानिक गट-तट, भाऊबंदकी असे वेगवेगळे कंगोरे या निवडणुकांमध्ये बघावयास मिळते. सलग चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे कृषिमंत्री भुसे यांच्या गटाने गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायत, बाजार समिती, जिल्हा परिषद- पंचायत समिती, महापालिका अशा विविध निवडणुकांमध्येही घवघवीत असे यश मिळवत शहर, तालुक्यात शिवसेनेचा दबदबा निर्माण केला आहे. प्रस्थापित अशा हिरे घराण्याला सत्तेतून पायउतार के ल्यानंतर यशाचा आलेख उंचावत सद्य:स्थितीत एकप्रकारे भुसेंचेच राजकीय साम्राज्य निर्माण झाल्याचे तालुक्यात चित्र आहे. भुसेंच्या या साम्राज्याला धक्का देण्यासाठी विरोधकांनी या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्याचाच भाग म्हणून निम्म्याहून अधिक ठिकाणी सेनेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपशी युती केल्याचे दिसून आले. त्याचा या तिन्ही पक्षांना फायदा झाला असला तरी, त्या तुलनेत भुसे आणि त्यांच्या शिवसेनेचाही प्रभाव बऱ्यापैकी टिकून असल्याचे ताज्या निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत आहे.

सर्वाचे लक्ष वेधून घेतलेल्या झोडगे ग्रामपंचायतीत १५ पैकी ११ जागा जिंकत सेना गटाने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अद्वय हिरे गटाला तेथे केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले असून पंचायत समितीच्या सभापती सुवर्णाताई देसले यांचे पती विजय देसले यांना धक्कादायक पराभव सहन करावा लागला. शहराला लागून असलेल्या चंदनपुरी येथे सेनेच्या एका गटाने राष्ट्रवादीशी युती करून सेनेसमोरच आव्हान निर्माण केले होते. मात्र असे असतानाही १५ पैकी ११ जागा जिंकत तेथे सेनेने आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले. चिंचावड येथे १३ पैकी सात जागा जिंकत सेनेने राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप आघाडीवर मात केली. निमगाव येथे सेना-काँग्रेस गटाच्या आघाडीबरोबर भाजप-राष्ट्रवादी गटाचा सामना रंगला. तेथे सेना-काँग्रेसच्या आघाडीने १५ पैकी तब्बल १३ जागा जिंकत विरोधकांना धोबीपछाड दिला. खडकी येथे सात पैकी पाच जागांवर सेनेने यश मिळविले. बाजार समितीचे उपसभापती आणि शिवसेना नेते सुनील देवरे हे तेथे विजयी झाले.

पिंपळगाव येथे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार आणि राष्ट्रवादीचे डॉ. जयंत पवार यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटांमध्ये रंगलेली निकराची लढत डॉ. पवार गटाने जिंकली. पवार गटाला तिथे ११ पैकी सात जागा मिळाल्या. बहुचर्चित खाकुर्डी येथील निवडणुकीत सेनेला मोठी हार पत्करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस गटाने तेथे ११ पैकी नऊ  जागांवर दणदणीत विजय मिळवला. रावळगाव येथे १७ पैकी १२ जागांवर हिरे गटाने यश संपादन केले. तेथे एकाच घरातील दोन सख्खे भाऊ  आणि त्यांच्या पत्नी अशा चौघांनी विजयश्री खेचून आणली आहे.