काही देशांच्या निकष स्पष्टतेअभावी गोंधळ; ‘अपेडा’ने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची मागणी 

वैशिष्टय़पूर्ण चवीमुळे जगातील बहुतांश देशांत आपली हक्काची बाजारपेठ निर्माण करणाऱ्या भारतीय द्राक्षांसमोर यंदाच्या हंगामात काही देशांमध्ये निर्यातीविषयी संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी द्राक्ष आयातीसाठी वेगवेगळे निकष निश्चित केले आहेत. या निकषांची ‘अपेडा’ स्पष्टता करीत नसल्याने निर्यातदार त्या देशांमध्ये द्राक्षे पाठवावीत की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यातच, परदेशी व्यापार विभागाने परिपत्रकाद्वारे उपरोक्त निकषांचे उल्लंघन झाल्यास दंड आणि निर्यात परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. या घडामोडींमुळे यंदाच्या हंगामात निर्यातीवर परिणाम होण्याची धास्ती व्यक्त होत आहे.

Why Indian Muslims are banish from elections
भारतीय मुस्लीम निवडणुकीतून हद्दपार का?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

द्राक्ष हे देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ. मागील हंगामात तब्बल दोन लाख ३२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून दोन हजार कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. या हंगामात द्राक्ष बागा परतीच्या आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के घट झाली असताना हे नवीन संकट उभे ठाकले आहे. कृषिमाल आयात करताना प्रत्येक देशाच्या द्राक्ष-मण्यांचा आकार, द्राक्ष-घडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचे अंश आदींवर आधारित काही निकष आहेत. या निकषांचे पालन करीत भारतीय द्राक्षांनी युरोपीय देशांत आपली ओळख निर्माण केली. २०१० हे वर्ष त्यास अपवाद ठरले होते. कीटकनाशकांचे अधिक अंश आढळल्यावरून काही देशांनी भारतीय द्राक्षे नाकारली होती. त्या वेळी निर्यातदारांसह उत्पादकांचे हात पोळले गेले. तेव्हापासून कीटकनाशकांची तपासणी केल्याशिवाय त्या देशांमध्ये माल पाठविला जात नाही. या वर्षी हंगामाला सुरुवात होण्याच्या सुमारास अपेडाने रशिया, चीन आणि इंडोनेशियासह संयुक्त अरब अमिरात यांनी निकष जाहीर केल्याची कल्पना दिली होती, परंतु हे निकष नेमके काय, याबद्दल आजपर्यंत निर्यातदार अनभिज्ञ आहे. त्यांची स्पष्टता करावी, यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही अपेडाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार द्राक्ष निर्यातदार संघटनेने केली आहे. सद्य:स्थितीत काही देशांत द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे. त्या देशांमध्ये विहित निकषांच्या आधारे तपासणी होईल की नाही हे सांगता येत नाही. पण, तपासणी झाल्यास पुन्हा सात वर्षांपूर्वीसारखे संकट ओढवू शकते, अशी निर्यातदारांना भीती आहे. भारतीय द्राक्षांसाठी रशिया ही मोठी बाजारपेठ आहे. गतवर्षी रशियाला सुमारे २७ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. संयुक्त अरब अमिरातला १२ हजार मेट्रिक टन द्राक्षे पाठविण्यात आली. या दोन देशांसह इंडोनेशिया आणि चीनने द्राक्ष आयातीसंदर्भात निकष निश्चित केले वा बदलले आहेत. द्राक्ष निर्यात अपेडाच्या नियंत्रणाखाली पार पडते. अपेडाने एका बैठकीच्या इतिवृत्ताचा संदर्भ देऊन उपरोक्त निकषानुसार द्राक्ष पाठवावेत, असे सूचित केले. कीटकनाशकांच्या अंशाचे प्रमाण वा तत्सम बाबींचा अंतर्भाव असणारी मार्गदर्शक तत्त्वे अपेडाने जाहीर करणे आवश्यक होते. ही जबाबदारी अपेडाने स्वीकारली नाही. उलट त्या देशांत द्राक्ष निर्यात करताना कीटकनाशकांचे प्रमाण तपासले जाईल की नाही हे सांगता येत नाही. निर्यातदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर माल पाठवावा, असा पवित्रा अपेडाने स्वीकारल्याचा आरोप द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी केला. कित्येक जण माल पाठवण्यास तयार नाहीत. मात्र, ज्यांनी माल पाठविला नाही, त्यांना निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेऊन आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. या घडामोडीत परदेशी व्यापार विभागाने काढलेल्या परिपत्रकाने गोंधळात भर घातली. निकषांनुसार माल न पाठविल्यास दंड आणि निर्यातदार परवाना रद्द होण्याची कारवाई होऊ शकते, असे सूचित करण्यात आले. शासकीय यंत्रणांच्या कार्यशैलीमुळे निर्यातदार बुचकळ्यात पडले आहेत. निकषांबाबत कोणाचा आक्षेप नाही. ज्या देशांचे निकष ज्ञात आहेत, त्या अनुषंगाने अपेडाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी द्राक्ष निर्यातदार संघटनेची मागणी आहे.

  • द्राक्ष निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्य़ात ३० हजारहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. उपरोक्त देशांमधील निर्यातक्षम द्राक्षांमधील कीटकनाशकांची पातळी काय आहे, याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध होण्याची गरज आहे. या घडामोडींचा परिणाम निर्यातीवर होऊ शकतो.
  • हंगामाच्या प्रारंभी निर्यातक्षम द्राक्षांना ११० ते १२० रुपये किलोपर्यंत मिळालेला भाव जानेवारीच्या सुरुवातीला ८० ते ९० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
  • जानेवारीच्या मध्यानंतर मुबलक द्राक्षे बाजारात येण्यास सुरुवात होईल. तेव्हा हे भाव आणखी खाली येतील.

द्राक्षनिर्यात प्रक्रियेत कोणताही गोंधळ झाला की, निर्यातदार, संघटना आणि उत्पादकही सरकारी कार्यपद्धतीला दोष देण्यात समाधान मानतात. उत्पादकाने स्वत:वर र्निबध लावणे, निकषांची पूर्तता करणाऱ्या चांगल्या दर्जाचा माल निर्यातीसाठी देणे आवश्यक आहे. अनेकदा तसे घडत नसल्याने निकषांची पूर्तता न करणारा मालही परदेशात गेल्यास एकूणच भारतीय द्राक्षांची प्रतिमा खराब होऊ शकते. निश्चित केलेला भाव पाडून दिला जातो. हे प्रकार टाळण्यासाठी उत्पादकाने गुणवत्तापूर्ण द्राक्षे पाठवून परदेशी बाजारात भारतीय द्राक्षांची प्रतिमा जपण्याची आवश्यकता आहे.

धिरज तिवारी (निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, वणी)