21 February 2019

News Flash

ढगाळ वातावरणात पावसाची धास्ती

 सध्या बहुतांश ठिकाणी द्राक्ष एकतर काढणीवर आहे किंवा तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

द्राक्षांमध्ये साखर उतरण्याच्या प्रक्रियेत संथपणा

फेब्रुवारीच्या प्रारंभापासून अंतर्धान पावणाऱ्या थंडीची जागा बुधवारी अकस्मात ढगाळ वातावरणाने घेतली आणि पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडतो की काय, अशी धास्ती द्राक्ष उत्पादकांमध्ये निर्माण झाली. या वातावरणात द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरणे, त्याला आकर्षक रंग प्राप्त होण्याची प्रक्रिया मंदावणार आहे. दिवाळीपासून प्रदीर्घ काळ गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमधून थंडी परतीच्या मार्गावर निघाल्याचे चित्र आहे. मागील १० दिवसांत तापमानात सात ते आठ अंशाची वाढ झाली. बुधवारी पारा १५.८ अंशावर पोहोचला.

सध्या बहुतांश ठिकाणी द्राक्ष एकतर काढणीवर आहे किंवा तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या स्थितीत वातावरणाचा पालटलेला नूर द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढविणारा ठरला आहे. यंदा बराच काळ नाशिककरांना गारव्याची अनुभूती मिळाली. दिवाळीपासून कमी झालेले तापमान जानेवारीपर्यंत तसेच राहिले. २५ जानेवारी रोजी हंगामातील ७.२ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. फेब्रुवारीपासून वातावरणात झपाटय़ाने बदल झाले. १० दिवसांत तापमान सात अंशांनी वाढले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली. थंडी निरोप घेण्याच्या मार्गावर असताना बुधवारी किमान तापमान १५.८ अंशावर गेले.

ढगाळ वातावरणामुळे सकाळी अवकाळी पाऊस पडतो की काय, असे चित्र होते. दुपारनंतर मात्र, काही भागात सूर्यदर्शन घडले. द्राक्ष बागा असणाऱ्या भागात कुठेही पावसाचा शिडकावा झाला नसल्याचे द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.  सुमारे अडीच महिन्यांपूर्वी अवकाळी पावसाने मणी फुटणे वा तत्सम नुकसानीला तोंड द्यावे लागते होते. तसे संकट सध्या उद्भवलेले नाही. परंतु वातावरण कधी कोणते वळण घेईल याचा नेम नाही. निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये अनेक उत्पादकांनी संघाच्या मदतीने खासगी स्वयंचलित हवामान केंद्र बसविले आहेत. या केंद्राचे संचलन करणाऱ्या कंपनीकडूनही पावसाचा अंदाज वर्तविला गेलेला नाही.

निर्यातक्षम द्राक्षांचा भाव ६० ते ७५ किलो

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष कमी आहेत. अवकाळी पावसाने आधीच पावसाचे नुकसान झाले होते. सध्या निर्यातक्षम द्राक्षांसाठी ६० ते ७५ रुपये किलो, तर देशांतर्गत बाजारासाठी ३० ते ६० रुपये किलो हा दर उत्पादकांना मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला निर्यातक्षम द्राक्षांना १०५ ते १२० रुपयांपर्यंत दर मिळाले होते. आवक जशी वाढत आहे, तसे दर कमी होत आहे. अनेक ठिकाणी काढणीचे काम सुरू असून काही ठिकाणी बागा तयार होत आहे. अंतिम टप्प्यात वातावरण ढगाळ झाल्यामुळे वातावरणातील घडामोडींकडे उत्पादकांचे लक्ष आहे.

तापमान अधिक असल्यास अर्थात ऊन असल्यास द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरणे, त्याला आकर्षक रंग प्राप्त होण्याची प्रक्रिया जलदगतीने घडते. ढगाळ हवामानामुळे ही प्रक्रिया मंदावणार आहे. वातावरणातील सध्याच्या घडामोडींनी द्राक्ष तयार होण्याची प्रक्रिया लांबणार आहे.

माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ

First Published on February 8, 2018 1:47 am

Web Title: grapes production cloudy environment