पुढील मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्ताव जाणार; सविस्तर प्रकल्प अहवाल प्रगतिपथावर

सार्वजनिक जलद वाहतुकीची भविष्यातील गरज लक्षात घेऊन महा मेट्रोने शहरासाठी मांडलेल्या टायरवर आधारित ‘मेट्रो निओ’ प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिली. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असून केंद्राची मान्यता मिळेपर्यंत प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवालाला अंतिम रूप देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतल्या गेलेल्या या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

देशातील या प्रकारची ही पहिलीच व्यवस्था असून अंतिम मान्यतेनंतर चार वर्षांत तो पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांतर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली. इतर महानगरातील मेट्रो आणि नाशिकची मेट्रो निओ यामध्ये कमालीचा फरक आहे. इतर शहरांमधील रेल्वे रुळावरील, तर नाशिकची मेट्रो रबरी टायरवर धावणारी असेल. यामुळे खर्चात मोठी बचत होणार असल्याचा मेट्रोचा दावा आहे. या प्रकारची ही देशातील पहिलीच व्यवस्था ठरणार आहे. या प्रकल्पास अंदाजे १८०० कोटींचा खर्च असून या प्रकल्पाचा अहवाल शासनास सादर करण्यात आला होता. त्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याने केंद्राच्या मान्यतेसाठी तो पाठविला जाईल, असे महा मेट्रोच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

या प्रकल्पांतर्गत गंगापूर-नाशिकरोड आणि गंगापूर-मुंबईनाका या दरम्यान उड्डाण पुलासारख्या स्वतंत्र मार्गिका तयार केल्या जाणार आहेत. इतर भागांतील नागरिकांना सेवेचा लाभ घेता यावा म्हणून अन्य दोन पुरवठा मार्गावर इलेक्टिक बसची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. इतर शहरांमध्ये मेट्रोसाठी प्रति किलोमीटर २५० ते ४०० कोटी खर्च आला आहे. हाच खर्च नाशिकच्या प्रकल्पात केवळ प्रति किलोमीटर ६० कोटी होईल. या प्रकल्पाचा फारसा आर्थिक भार महापालिकेवर पडू नये, असा प्रयत्न आहे. एकूण प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उभारली जाणार असून उर्वरित ४० टक्के रकमेतील निम्मा निम्मा हिस्सा केंद्र, राज्य शासन उचलणार आहे.

मेट्रोच्या प्रस्तावित मार्गाचे नियोजन

*    गंगापूर-नाशिक २२ किलोमीटरच्या मार्गावर १९ स्थानके

*    गंगापूर-मुंबईनाका या १० किलोमीटरच्या मार्गावर १० स्थानके

*    मेट्रो मार्गावर सीबीएस संयुक्त स्थानक

*    मुख्य मेट्रो मार्गावर येण्यासाठी दोन स्वतंत्र पुरवठा मार्ग

*    मुंबई नाका, गरवारेमार्गे सातपूर आणि नाशिकरोड स्थानक नांदुरनाका मार्गे शिवाजीनगर (प्रत्येकी १२ किलोमीटर)

*    द्वारका चौकात मेट्रो मार्ग उड्डाणपुलावरून जाईल.