*  यशवंतराव महाराज पटांगण स्वस्त, तर अनंत कान्हेरे मैदान महाग

*  चौक सभांसाठी प्रत्येकी २५० रुपये मोजावे लागणार

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून आगामी काळात विविध राजकीय नेत्यांच्या जाहीर सभांचा धुराळा उडणार आहे. या सभांसाठी शहरात १० मैदाने उपलब्ध असून त्यांचे दर जाहीर झाले आहेत. त्यानुसार गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगणावरील सभा तुलनेत स्वस्त म्हणजे २८०० रुपयांत, तर इदगाह मैदान, हुतात्मा अनंत कान्हेरे या मैदानांवरील सभेला २८ हजार ८७५ रुपये मोजावे लागणार आहेत. कोणत्याही मैदानावरील विहित शुल्कावर १८ टक्के जीएसटी करही स्वतंत्रपणे भरावा लागणार आहे.

नाशिक, दिंडोरी, धुळे लोकसभा मतदारसंघात चवथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर सभांसाठी मैदानांची नोंदणी झालेली नाही. मात्र प्रचार साहित्य, फलक उभारणी, सभा, बूथसाठी जागा वापर याचे दर महापालिकेने निश्चित केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांना विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक खिडकी योजना कार्यान्वित करून कामाचे विकेंद्रीकरण करण्यात आले. यामुळे स्थानिक पातळीवर परवानगी किंवा तत्सम प्रक्रिया पार पाडण्याची सुविधा देण्यात आल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आणि तहसीलदार रचना पवार यांनी सांगितले.

राजकीय पक्ष, उमेदवारांना शहरात चौक सभा घेण्यासाठी प्रत्येक सभेला २५० रुपये शुल्क भरावे लागेल. खासगी जागेत कापडी फलक किंवा जाहिरात फलक लावल्यास अनुक्रमे प्रत्येकी २०० आणि ३०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. भित्तीपत्रक, झेंडे, लहान चिन्ह, प्रचाराचे मफलर, चिन्ह, टोपीसाठी प्रत्येकी १० रुपये शुल्क आकारले जाईल. सभेच्या ठिकाणी कापडी फलक लावण्यासाठी प्रती नग २०० रुपये, खासगी जागेत जाहिरात फलकासाठी प्रती नग ३०० रुपये, वाहनावरून प्रचार करताना फलक आणि झेंडा लावल्यास अनुक्रमे २५० आणि १० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. लहान बूथसाठी प्रति बूथ १५०, तर मोठय़ा आकाराच्या बूथसाठी ९०० रुपये शुल्क आहे. इदगाह मैदान आणि सिडकोतील संभाजीराजे स्टेडीअमवर हेलिपॅड परवानगीसाठी एक दिवसाचे प्रत्येकी ७०० रुपये (जीएसटी स्वतंत्र) शुल्क राहील. मिरवणूक, रोड शोसाठी शुल्क नाही. केवळ पोलीस विभागाकडून परवानगी घ्यावी, असे पालिकेने म्हटले आहे. प्रत्येक मैदानासाठी प्रति सभा दर आणि अनामत रक्कमही वेगवेगळी आहे.

अन्य काही नियम

रस्ते, इमारती, दुभाजक, वीज खांब आदी ठिकाणी प्रचाराचे साहित्य, फलक, चिन्ह किंवा चित्र मालमत्ता प्रतिबंधक कायद्यान्वये लावता येणार नाही. सभेच्या ठिकाणी प्रचार साहित्य लावण्यास परवानगी दिली जाईल. त्याकरिता विहित निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. खासगी जागेत फलक लावण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवारांना संबंधित मालकाचे संमतीपत्र, पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र, घरपट्टी पावती, सात-बारा उतारा, जागेचा नकाशा आणि प्रती फलक १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.

मैदानांवरील प्रति सभा शुल्क (जीएसटी स्वतंत्र)

*  श्री यशवंत महाराज पटांगण – २८००/- रुपये

*  पवननगर मैदान, सिडको – ३८१८/- रुपये

*  शिवाजी चौक भाजी मार्केटमागे, सिडको – ४,९७८/- रुपये

*  पाटीलनगर मैदान, सिडको – ६९६६ रुपये

*  नाशिकरोड महापालिका शाळा क्रमांक ५७ चे मैदान – ८९५७ रुपये

*  शिखरेवाडी मैदान, नाशिकरोड- १३,२६२ रुपये

*  नाशिक क्लब हाऊस, सातपूर – १८,०८४ रुपये

*  राजे संभाजी स्टेडिअम, सिडको – २१,९८० रुपये

*  इदगाह आणि हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान – प्रती २८, ८७५ रुपये