News Flash

संमेलनात पुस्तक प्रकाशनासाठी हमीपत्र

वाद टाळण्यासाठी संयोजन समितीचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

अनिकेत साठे

साहित्य संमेलनात लेखकाला पुस्तक प्रकाशित करावयाचे असल्यास नोंदणी अर्जाबरोबर हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. पुस्तकासंदर्भात कोणताही वाद निर्माण होणार नाही आणि असा काही वाद झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही केवळ आणि केवळ लेखकाची राहील.

अशा उद्भवलेल्या वादाशी किंवा मतभेदाशी मराठी साहित्य महामंडळ, लोकहितवादी मंडळ आणि ग्रंथ प्रकाशन समितीचा कोणताही संबंध राहणार नाही, याची हमी द्यावी लागणार आहे. संमेलनाच्या व्यासपीठावर असा प्रकार पहिल्यांदाच होत असून लेखकाच्या हातून काही प्रमाद घडला किंवा घडणार आहे, यादृष्टीने त्याच्याकडे पाहिले जात असल्याचा सूर साहित्य वर्तुळात उमटत आहे.

मार्चच्या अखेरीस येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. संमेलन नियोजित वेळेत होईल की पुढे ढकलले जाईल, यावर लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. या घडामोडीवर लक्ष देऊन समित्यांचे काम सुरू आहे. संमेलनात पुस्तक, ग्रंथ प्रकाशनासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते आपले पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. ती या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. पण असे पुस्तक प्रकाशित करावयाचे असल्यास संबंधितांना वैयक्तिक, प्रकाशकासह पुस्तकाचे शीर्षक, साहित्य प्रकार, प्रथम आवृत्ती वर्ष, पुस्तकाविषयी माहिती द्यावी लागेल. तसेच संबंधित पुस्तक हे ‘मी स्वत: लिहिलेले असून नोंदविलेली मते, विचार, निरीक्षणे, आकडेवारी ही माझ्या दृष्टीकोनातून अचूक आहे. पुस्तकातील आशय, तपशील आणि शैली याची संपूर्ण जबाबदारी ही केवळ माझी असून पुस्तकासंदर्भात कोणताही वाद झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील’, हे लेखकाकडून मान्य करून घेतले जाते. आतापर्यंत १२५ पुस्तकांची प्रकाशनासाठी नोंदणी झालेली आहे. पुस्तकावरून अनेक वाद उद्भवतात. अशा प्रसंगात संयोजक वा साहित्य महामंडळाशी संबंध जोडला जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली. प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची तज्ज्ञ समितीकडून छाननी करण्याचा आधी विचार होता. पण ऐनवेळी पुस्तके येतील, छाननी कधी होईल असे प्रश्न होते. त्यावर हमीपत्राने तोडगा काढण्यात आला.

या हमीपत्रावर काही ज्येष्ठ लेखकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संमेलनात आजतागायत असे हमीपत्र भरून घेतले गेले नसेल. मुळात पुस्तकाची जबाबदारी लेखक / प्रकाशकावर असते. हमीपत्रातून त्यांच्यावर शंका उपस्थित होते. संशोधन कार्यात असे हमीपत्र द्यावे लागते. कविता स्पर्धेत स्वरचित काव्याबाबत तसा नियम असतो. शैलीची काय जबाबदारी असते, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. अर्ज, हमीपत्रातील अनेक मुद्दे संमेलनात प्रकाशित होणाऱ्या वाड्:मय प्रकाराला लागू पडणार नाही. कारण, संमेलनात जी पुस्तके प्रकाशित होतात, त्यामध्ये निम्म्याहूून अधिक कवितासंग्रह आणि उर्वरित साहित्येतर अर्थात ललितेतर असतात. हमीपत्र घेऊन नेमके काय सुचवायचे आहे, वाद, मतभेद कशाचीही जबाबदारी घ्यायची नाही का, असे काही वाद होणार असल्याचे वाटते काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संमेलनात प्रकाशनासाठी आतापर्यंत १२५ पुस्तकांची नोंदणी झालेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून इच्छुक लेखकांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करायची आहेत. ती पुस्तके घेऊन वाचणे, तज्ज्ञ समितीकडे जाणे सध्या अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे संयोजन समिती आणि समितीने नोंदणी अर्ज आणि हमीपत्र भरून घ्यायचे ठरवले. त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.

-डॉ. राहुल पाटील, प्रमुख, ग्रंथ प्रकाशन समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:11 am

Web Title: guarantee for book publication at the sahitya sammelan abn 97
Next Stories
1 साहित्य संमेलनाबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय
2 नाशिक जिल्ह्यत जमीन लाटण्याची ‘नवी पद्धत’
3 एकाच वाडय़ाला तिसऱ्यांदा आग
Just Now!
X