27 September 2020

News Flash

शनिशिंगणापुरात परिवर्तनाची गुढी

महिलांना चौथऱ्यावर प्रवेश खुला; देवस्थानचा ऐतिहासिक निर्णय

महिलांना चौथऱ्यावर प्रवेश खुला; देवस्थानचा ऐतिहासिक निर्णय
शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास शनिशिंगणापूरातील शनैश्वर देवस्थानने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन परिवर्तनाची गुढी उभारली. अनेक वर्षांच्या रूढी व परंपरेला फाटा देत स्त्री-पुरुष समानतेचा हा निर्णय महिलांच्या आंदोलनामुळे झाला. भूमाता ब्रिगेडच्या प्रियंका जगताप व पुष्पा देवडकर यांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले. गावकऱ्यांचा मात्र अजूनही विरोध कायम असून आज, शनिवारी या मुद्दय़ावर ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली महिलांना शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास परवानगी मिळावी म्हणून आंदोलन सुरू होते. सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी दाखल केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाने महिलांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास परवानगी दिली होती. मात्र गावकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना दर्शन घेता आले नाही. या आंदोलनामुळे पुरुषांनाही चौथऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. दरवर्षी गुढी पाडव्याला भाविक प्रवरासंगम येथून गंगेचे पाणी कावडीने आणून शनिदेवाला अभिषेक करतात. मात्र विश्वस्तांनी कावडीचे पाणी चौथऱ्याच्या खाली असलेल्या पादुकांवर घालावे असा निर्णय घेतला. तो गावकऱ्यांनी धुडकावला.
गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे विश्वस्त मंडळाने जर पुरुष भाविक चौथऱ्यावर जात असतील, तर न्यायालयाच्या निर्णयानुसार भक्तांमध्ये भेदभाव करता येणार नाही, अशी भूमिका घेत लगेचच चौथरा सर्वासाठी खुला केला. हा निर्णय उपाध्यक्ष बानकर यांनी जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार यशवंतराव गडाख व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळ असून त्यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला. पोलीस पाटील सयाराम बानकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. धार्मिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानतेची गुढी उभारली गेली. महिलांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा भूमाताच्या तृप्ती देसाई यांनी केला.

श्रेयासाठी धावपळ
* चौथऱ्यावर जाऊन दर्शन खुले झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी भूमाताच्या तृप्ती देसाई या पुण्याहून तातडीने निघाल्या.
* पण त्यांच्या संघटनेतून फुटून बाहेर पडून नवी संघटना स्थापन केलेल्या प्रियंका जगताप व पुष्पा देवडकर यांनी सर्वात आधी येथे येऊन चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले.
* अनेक वर्षांच्या प्रथा परंपरा व रूढीला फाटा देऊन दर्शन घेण्याऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
ल्लविशेष म्हणजे महिलांमुळे पुरुष भक्तांनाही चौथऱ्यावर जाऊन दर्शनाची संधी मिळाली. यापूर्वी पोलीस हस्तक्षेप करत होते. शुक्रवारी मात्र देवस्थानच्या निर्णयामुळे त्यांनी बंदोबस्त ठेवला तरी कुठलाही विरोध केला नाही.

शनिशिंगणापूर देवस्थानचा निर्णय स्वागतार्ह आहे. २१व्या शतकाच्या या युगात आपल्याला प्रगती साधायची असेल तर जनतेला मनातील जातीपातीची आणि लिंगभेदाची जळमटे काढून टाकावी लागतील. सनातन हिंदूधर्मात भेदभावाला कधी स्थान नव्हतेच.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Untitled-10

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:04 am

Web Title: gudi padwa celebration in shani shingnapur
टॅग Shani Shingnapur
Next Stories
1 कोरडय़ा रामकुंडासाठी टँकरद्वारे पाणी
2 धोरणे चुकल्यास भाजपला घरी पाठवू!
3 देवळ्यात कुपोषित बालिका
Just Now!
X