२६ जुलैपासून विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेश नोंदणी

नाशिक :  विद्यार्थ्यांना ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालय, एस. एम. आर. के. महिला महाविद्यालय, बी. वाय. के. महाविद्यालय, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, भोसला सैनिकी महाविद्यालय, सिडको महाविद्यालय, पंचवटी महाविद्यालय येथे मार्गदर्शन केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच किमान कौशल्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आडगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे मार्गदर्शन केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

करोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई महानगर तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील ११ वी प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून २२ जुलैपासून प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू होईल; परंतु प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकातील बदलाची पूर्वकल्पना नसल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास उत्सुक असलेले विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबई, पुण्यातील काही भागांसह राज्यातील इतर काही शहरांमध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मार्गदर्शन केंद्र तसेच माध्यमिक शाळांना, विद्यार्थी आणि पालक यांना प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येऊ नयेत, आवश्यक कागदपत्रे मिळविता यावीत, यासाठी वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पातळीवर झालेल्या बदलांची माहिती विद्यार्थी, पालक तसेच संबंधित महाविद्यालयांना नसल्याने बुधवारी सकाळपासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेचा पहिला भाग नोंदणीच्या तयारीत होते. काही पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्येही त्यासाठी धाव घेतली.

नवीन वेळापत्रकानुसार उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर २२ जुलैपासून नोंदणी करण्यास सुरुवात करावी, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून ऑनलाइन प्रमाणित करण्यासाठी २४ जुलैपर्यंत कालावधी आहे. २६ जुलैपासून ११वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे, अर्ज भाग एक भरणे, अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा, मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला अर्ज तपासणी झाला की नाही याची खात्री करून घेणे, २७ जुलै रोजी विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग १ ऑनलाइन तपासण्यात येईल. इयत्ता १०वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरण्यास सुरुवात करायची आहे.

आजपासून संकेतस्थळावर सरावासाठी अर्ज उपलब्ध

विद्यार्थ्यांना ११वी प्रवेशासाठी अर्ज भरताना अडचणींना सामोरे जाऊ लागू नये, त्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा, मूळ अर्ज भरताना चुका होऊ नयेत. यासाठी १६ ते २४ जुलै या कालावधीत संकेतस्थळावर केवळ सरावासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये भरलेली माहिती २४ जुलैनंतर नष्ट करण्यात येईल. २६ जुलैपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.