ज्ञानाचा महिमा कितीही अगाध असला तरी त्याची ओळख करून देणाऱ्या गुरूला तितकेच महत्त्व आहे. गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाच सूर आणि तालाच्या मैफलीची अनुभूती रसिकांना मिळावी यासाठी येथील ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल आणि अथर्व संगीत विद्यालय यांच्यातर्फे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ‘गुरुवंदना’ संगीत सोहळ्याचे आयोजन केले आहे. मैफलीत पं. शंकर वैरागकर यांच्या शास्त्रीय गायनासह तबला, संवादिनी आणि मृदंगाच्या तालाची अनोखी भेट रसिकांना मिळणार आहे.

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, संगीत, नृत्य आदी प्रकारांचे शिक्षण घेत असताना गुरू आपल्या आयुष्याला एक वेगळा आकार देत असतो. गुरू-शिष्याचे नाते कालातीत आहे. काळ बदलत असला तरी गुरूप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आजही कायम आहे. गुरुवंदना संगीत सोहळ्याच्या माध्यमातून संगीत विश्वात उल्लेखनीय योगदान दिलेल्या गुरुवरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून नाटय़क्षेत्रातील जयप्रकाश जातेगांवकर, उद्धव अष्टुरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच गुरुवर्य पं. शंकर वैरागकर व मकरंद हिंगणे यांचे शास्त्रीय गायन, त्यांना आनंद अत्रे (संवादिनी), नितीन वारे (तबला), व्यंकटेश ढवण (मृदुंग), प्रमोद भडकमकर (तबला) आणि जगदेव वैरागकर (संवादिनी)संगीत साथ करणार आहे. रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी केले आहे.गायनाची परंपरा आणि त्यातून निर्माण झालेली शक्ती हे भारतीय संस्कृतीचे मोठे वैशिष्टय़ आहे. मग ते तालवाद्य असो वा तारवाद्य. कंठसंगीताचा आवाका त्याहून मोठा आहे. म्हणजे स्वरांना पूर्ण आवर्तन देऊन ते आळविण्याचे कौशल्या कंठसंगीतात आहे, अशी प्रतिक्रिया कलाकारांनी व्यक्त केली.