राज्यभर ४० हजारांवर शाखा

राज्यभर चाळीस हजारावर शाखा असणाऱ्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामजीवनाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळाची कार्यकक्षा स्पष्ट केली होती, पण आज त्याची प्रासंगिकताच हरवत चालल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भाग शेतकऱ्यांच्या वेदनांनी हुंकारत असताना त्यांना आश्वस्त करण्यासाठी, आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी तसेच त्यांच्यावरील अन्यायाला वाचा   फोडण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळे प्रभावी साधन ठरू शकतात. माजी सर्वाधिकारी बबनराव वानखेडे यांनी वर्धेतील गुरुदेव कार्यकर्ता संमेलनात ही बाब बोलून दाखविली होती. तसेच ही मंडळे भजन-प्रार्थनेपर्यंतच मर्यादित राहू नये, अशीही अपेक्षा व्यक्त केली होती, पण गावागावातील ही सेवा मंडळे परस्पर वादांनी पोखरल्या गेल्याची सद्यस्थिती आहे. राष्ट्रसंतांनी शेतकऱ्याला ग्रामनाथ संबोधून गावासाठी ग्रामगीता लिहिली. आचरणासाठी ग्रामजयंती महोत्सवाची बाब मांडली, परंतु त्यांच्या पश्चात हा आदर्श विचार मूठभर गावापुरताच प्रवाही राहिला. सेवा मंडळाच्या भगव्या टोपीचा रंग विरळ होत गेला.

UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Calcutta High Court
संदेशखालीतील प्रकरण अत्यंत लाजिरवाणे; कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

१९३५ साली आध्यात्मिक समाजभावनेला लक्षात घेत राष्ट्रसंतांनी आरती मंडळ स्थापन केले होते. पुढे राष्ट्रीय चळवळीच्या पाश्र्वभूमीवर १९४३ साली गुरुदेव सेवा मंडळे स्थापन झाली. गावात एकोपा ठेवून ग्राम समृद्ध करण्याचे कार्य या मंडळांनी करणे महाराजांना अपेक्षित होते. महात्माजींच्या सेवाग्राम आश्रमातून परतल्यानंतर राष्ट्रसंतांनी महात्मा गांधींना त्यांच्या आश्रमात येण्याची विनंती केली होती. तेव्हा तुमच्या आश्रमातील जेवण अस्पृश्याच्या हातून तयार होते काय, असा सवाल गांधीजींनी केला. ती बाब महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांजवळ मांडल्यावर त्यांना अपेक्षित उत्तर मिळाले नाही. याबाबत खंत व्यक्त करीत ते गांधीजींना म्हणाले होते की, जातीभेदाबाबत माझे विचार मी सहकाऱ्यांवर लादू शकत नाही. त्यांना स्वत:ला ते पटावे म्हणून कार्य करण्याची हमी राष्ट्रसंतांनी दिली होती. या पाश्र्वभूमीवर सेवा मंडळांची जबाबदारी वाढली.

सेवा मंडळे चेल्याचपाटय़ांचे चकाटय़ा पिटण्याचे स्थान होऊ नये, अशी महाराजांची भूमिका होती, असे मत जेष्ठ प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक व्यक्त करतात. विकेंद्रीकरणाऐवजी केंद्रीकरण झाले. लोकशाहीवादी समन्वयाची भूमिका संपली. मात्र, आजही हरिभाऊदादा विरूळकर व त्यांचे सहकारी संस्कार शिबिरांच्या माध्यमातून युवकांना घडविण्याचे काम करतात. भंडारा, नांदुरा, नागपूर, अडय़ाळ टेकडी अशा भागात मंडळाचे कार्यकर्ते सेवाभाव जपत ग्रामसुराज्याचे काम करीत आहे. सेवा मंडळेच गावाची सुधारणा करू शकतात, असा विश्वास रक्षक यांनी व्यक्त केला.

गुरुदेव सेवा मंडळांच्या विद्यमान स्थितीबाबत राष्ट्रसंतांच्या विचाराने कार्य करणारी मंडळी खंत व्यक्त करतात. या मंडळासोबत नवी पिढी जुळत नाही. राष्ट्रसंतांना अपेक्षित कार्य मंडळाकडून होत नाही. नव्या प्रवाहांना जोडण्याबाबत संकुचित भाव दिसून येतात, असा विरोधातील सूर आहे. मानस मंदिरात पार पडलेल्या मंडळ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना विविध वक्त्यांनी त्याची दखल घेत यापुढे गांभीर्याने कार्य करण्याची गरज बोलून दाखविली.

विदर्भाच्या मातीत राष्ट्रसंतांचा विचार रूजला. ग्रामीण भागात तर गुरुदेव मंडळ कार्यकर्त्यांची भगवी टोपी परिचित आहे, पण वयाची साठी गाठणाऱ्या या पिढीनंतर हा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आहे. राष्ट्रसंतांचा ‘ग्रामनाथ’ आज विविध विवंचनांनी त्रस्त होत जगण्याचा संदर्भच गमावून बसला आहे. त्याचे जगणे सुसह्य़ करण्यासाठी मंडळे कार्यप्रवण होणार काय, याच्या उत्तराची अपेक्षा केली जात आहे.