शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत मेदगे मळ्याजवळ एका ट्रकमधून पोलिसांनी पाच लाख रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला. इतक्या मोठय़ा प्रमाणावर माल जप्त करण्यात आल्याने शहरात बाहेरून चोरटय़ा मार्गाने येणाऱ्या गुटख्यावर प्रकाश पडला आहे.
अंबड ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. डी. इंगोले हे औद्योगिक परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास वाहनातून आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. मेदगे मळ्याजवळील एका दुकानासमोर त्यांना एक ट्रक उभा असल्याचे दिसून आले. संशय आल्याने इंगोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात तब्बल १९ गोण्यांमध्ये गुटखा आढळून आला. इतक्या मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा पाहून पोलीस पथकही थक्क झाले. गुटखा साठय़ाची किंमत पाच लाख रूपये असून पोलिसांनी तीन लाख रुपयांचा ट्रकदेखील ताब्यात घेतला आहे. दरम्यान, अशा प्रकारे शहरात बाहेरील राज्यातून किंवा शहरातून अवैध मालाची होणारी वाहतूक उघड झाली आहे. शहराच्या इतर भागांमध्येही अवैध मालाची वाहतूक होत असल्याचा संशय यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांमुळेच शहरात गुन्हेगारी वाढू लागली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. शहराच्या भद्रकाली भागासह पंचवटीत जुगार आणि सट्टय़ाचे अड्डे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. पोलिसांनी सर्व ठिकाणी रात्रीची गस्त वाढविल्यास अनेक संशयित त्यांच्या हाती लागू शकतील, असे मत व्यक्त होत आहे.