नाशिक : दिंडोरी, निफाड, कळवण, नाशिक तालुक्यासह आसपासच्या भागास बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तडाखा दिला. वणी, जानोरी, तळेगाव फाटा, तिसगाव परिसरात गारपीट झाली. यामुळे खरड छाटणी झालेल्या द्राक्ष बागा आणि खळ्यात काढून ठेवलेला कांदा, गव्हाचे मोठे नुकसान झाले. ओझर, दिक्षी, सुकेणा, जानोरी भागात अवघ्या काही मिनिटांत रस्ते जलमय झाले. शहरातील पंचवटी परिसरात गारा पडल्या. वादळी वाऱ्यामुळे

अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. 

हवामान विभागाने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. मागील दोन दिवसांत काही भागात वातावरण ढगाळ होते. दिंडोरीत आदल्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी त्याचा परिघ अधिक विस्तारला. दुपारनंतर अकस्मात वातावरण बदलले. सायंकाळी मेघ गर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. जानोरी, आंबे, वणी, मावडी, संगमनेर, तळेगाव फाटा, तिसगाव परिसरात गारांसह पाऊस झाला. निफाड तालुक्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली. ओझर, दिक्षी, सुकेणा, मोहाडी येथे मुसळधार पाऊस झाला.

नाशिक शहरातील पंचवटी, आडगाव आणि तालुक्यातील अन्य काही भागात गारपीट, पावसाची अनुभूती मिळाली. शहरात मेघ गर्जनेसह वादळी वारे वाहत होते. पंचवटी, गंगापूर रोड, इंदिरानगरसह अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. निर्बंध लागू असल्याने पावसामुळे वीज पुरवठा वगळता अन्य गैरसोय झाली नाही. पावसामुळे सर्वत्र अंधार दाटला. वातावरणात काहिसा गारवा निर्माण झाला.

द्राक्ष बागा, कांदा, गव्हाचे नुकसान

गारपीट, पावसाचा फटका द्राक्षबागांसह अन्य पिकांना बसला आहे. द्राक्ष हंगामानंतर खरड छाटणी करावी लागते. दिंडोरी तालुक्यात बहुतांश द्राक्ष बागांची छाटणी झालेली आहे. खरड छाटणीनंतर द्राक्ष वेलींना जी कोवळी पालवी फुटली, तिला जखम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तो भाग खराब होऊन उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे वणी येथील द्राक्ष उत्पादक गणेश देशमुख यांनी सांगितले. उन्हाळी कांदा काढणीचे काम जोमात आहे. कांदे काढून शेतात ठेवले जातात. अकस्मात पावसाला सुरूवात झाल्यामुळे कांदा भिजला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. हीच अवस्था गव्हाची झाली. शेतात काढून ठेवलेली पिके, खळ्यावर मळणी सुरू असलेला गहू, हरभरा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.