सामाजिक उपक्रमांचीही साथ

नाशिक : उत्सवप्रिय नाशिककरांनी सरत्या वर्षांला शब्द-सूरांच्या मैफलीने, तर काहींनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना सुरूवात करीत निरोप देत  नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. काही सामाजिक संस्थांनी वंचितांपर्यंत नववर्षांचा आनंद पोहचविण्यासाठी प्रयत्न केले.

नववर्षांच्या स्वागतासाठी शहर परिसरातील वायनरी आणि कृषी पर्यटन केंद्रासह हॉटेलांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह खान-पानाची व्यवस्था करण्यात आली होती. काही हॉटेलमध्ये संगीताच्या ठेक्यावर आकर्षक नृत्य करणाऱ्या जोडप्यांना बक्षिसेही देण्यात आली. नागरिकांनी अशा हॉटेलांमध्ये गर्दी केल्याने त्यांच्या वाहनांनी हॉटेलांचे वाहनतळ तुडूंब होऊन महामार्ग तसेच शहरातील गंगापूर रस्त्यावर वाहने उभी करण्यात आल्याचे दिसून आले. खाद्य व्यावसायिकांकडून ५०० रुपयांपुढील देयकांवर विशेष सवलत देण्यात आली होती.

उच्चभ्रूंच्या या कोलाहलापासून अंतर राखत सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांनी घरीच शाकाहारी-मांसाहारी जेवणावर तावमारत आणि वेगवेगळ्या वाहिन्यांवरील कार्यक्रमांचा आनंद घेत नववर्षांचे स्वागत केले.

काहींनी शेकोटी पेटवत त्याभोवती फेर धरत नाच-गाण्याचा आनंद लुटला.

युवावर्गाने समाज माध्यमांच्या मदतीने आप्तस्वकीयांना शुभेच्छा नव्या वर्षांचे स्वागत केले. काही मंडळींनी जवळच्या पर्यटन स्थळावर मुक्काम ठोकला. नववर्षांच्या स्वागतातही काही संस्थांनी सामाजिकतेचे भान राखले. काहींनी रक्तदान शिबीर घेत रूग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. उधाण युवा ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जगदिश बोडके आणि सामाजिक कार्यकर्त्यां संदेशा पाटील यांच्या मदतीने शहर परिसरातील उड्डाणपुलाखालील, रस्त्यावरील, गंगेवरील बेघर अनाथांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी स्वेटर, टोपी या उबदार कपडय़ांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांना खाऊ देत त्यांची नववर्षांतील पहिली पहाट आनंदात जाईल, यासाठी प्रयत्न केले.