17 December 2017

News Flash

अखेर ‘त्या’ माकडीणीची जंगलात रवानगी..

त्र्यंबक येथील वेळुंजे परिसरात माकडीण २० दिवसांपासून गावात ठिय्या देऊन होती.

प्रतिनिधी, नाशिक | Updated: October 12, 2017 1:23 AM

गेल्या वीस दिवसांपासून त्र्यंबकजवळील वेळूंजे गावात माकडीण मांजरीच्या पिल्लाला घेऊन फिरत असताना अनेक महिला आणि मुलांना ती चावत असल्याच्या तक्रारी वनविभाग व नेचर क्लब ऑफ नाशिककडे करण्यात आल्या. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करत वनविभागाच्या मदतीने बचाव मोहीम राबवत तिला सुरक्षितरीत्या जंगलात सोडले. पिल्लू दगावल्याने माकडीणीचे मानसिक संतुलन ढासळल्याचे नेचर क्लबचे निरीक्षण आहे.

त्र्यंबक येथील वेळुंजे परिसरात माकडीण २० दिवसांपासून गावात ठिय्या देऊन होती. गावातील तिचा सर्वत्र सहज वावर ग्रामस्थांसाठी त्रासदायक ठरला. ती लहान मुलांना चावा घेऊ लागली. तिच्या जवळ असलेल्या मांजरीच्या पिल्लास तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होती. या विचित्र घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी त्या गावात जाऊन अभ्यास केला.

माकडीणीचे पिल्लू दगावल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यातच गावात मुले दगड मारीत असल्याने ती बिथरली. ग्रामस्थांकडूनही तिच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर, माकडीण हिंस्र होऊ नये याकरिता तिला पकडून जंगलात सोडणे आवश्यक होते.

नेचर क्लबने वनविभागाला कळविले व घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्र्यंबक येथील वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी गावात रात्री बचाव मोहीम राबविली.

भुलीचे इंजेक्शन देऊन माकडीणीला पकडण्यात आले. नंतर तिला जंगलात सोडण्यात आले. या कारवाईत वन कर्मचारी राजेंद्र भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना वनरक्षक निवृत्ती कुंभार, दर्शना सौपुरे, ऋषिकेश जाधव, मेजर थोरात, पोलीस पाटील नानासाहेब काशीद आदींची मदत झाली.

वन्यजीव पाळणे गुन्हा

नेचर क्लबने मागील महिन्यात १५ मोरांची देखील पिंजऱ्यातून सुटका केली. वन्यजीव कायद्यानुसार कोणतेही वन्यप्राणी पकडणे, पाळणे हा गुन्हा आहे. तीन ते पाच वर्षे कैद आणि २५ हजार रुपये दंडदेखील होऊ शकतो. माकड, मोर, पोपट आदी पाळणे गुन्हा असून जर पाळले असतील तर वनविभागाच्या ताब्यात देणे आवश्यक असल्याचे क्लबचे अध्यक्ष आनंद बोरा यांनी सांगितले.

First Published on October 12, 2017 1:05 am

Web Title: harmful monkeys sent to forest nashik forest department