शाळेतील शिक्षक दीड महिन्यांपासून गैरहजर; पहिली ते पाचवीचे विद्यार्थी एकाच वर्गात

इगतपुरी तालुक्यातील शेंगाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक दीड महिन्याहून अधिक काळ पूर्वसूचना न देता गैरहजर असल्याने मुख्याध्यापकांवरच शाळा चालविण्याची जबाबदारी आली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून मुख्याध्यापकच शिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.

शेंगाळवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीची प्राथमिक शाळा आहे. गावातच ही शाळा भरत असून २६ विद्यार्थी शाळेत येतात. विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकासह एका शिक्षकावर देण्यात आली आहे. मात्र येथील शिक्षक म्हसू अहिरे हे मुख्याध्यापक किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना पूर्वसूचना न देता सहा जानेवारीपासून गैरहजर आहेत. याआधीही जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर गायब झालेले अहिरे हे २५ जुलै रोजी शाळेत आले होते. याबाबत मुख्याध्यापक सुभाष मेंगाळ यांनी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना अहिरे गैरहजर असल्याचे स्मरणपत्र दोन वेळा पाठविले. याबाबत पंचायत समिती किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई  केली नाही.

दुसरीकडे, शिक्षक नसल्याने महत्त्वाच्या बैठका किंवा कामांसाठी मेंगाळ यांना शाळा सोडून जाणे अशक्य होते. एकाच वर्गात ही शाळा भरत आहे. वरिष्ठांकडे अहिरे यांच्या हलगर्जीपणाचा पाढा वाचूनही अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही.

लवकरच शाळेचे बांधकाम सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांचे वर्ग स्थलांतरित करावे लागतील. एकटय़ाने ही सर्व कामे पाहणे अडचणीचे ठरत असल्याची तक्रार मेंगाळ यांनी केली.

पालकांनी याविषयी नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीला पत्र देत शाळा पंचायत समितीच्या आवारात भरविण्याचा इशारा दिला आहे.