News Flash

किल्लय़ांची चढाई,भटकंती आरोग्यासाठी उत्तम

दुर्गजागृती व्याख्यानमालेत डॉ. रत्नाकर पटवर्धन

दुर्गजागृती व्याख्यानमालेत डॉ. रत्नाकर पटवर्धन

गडकिल्ले इतिहास सांगतात. गडकिल्लय़ांची भ्रमंती करताना दुर्गाचे काळे पाषाण, तेथील इतिहास, दुर्गावरील लढाईकडे अभ्यासात्मक वृत्तीने पाहिल्यास अनेक दाखले आढळतात. त्यांचा शोध आवश्यक आहे. भटकंतीत दुर्गावरील वस्तूंचा, माती, दगड आणि घडलेल्या घटनांचा, मातीने भरलेल्या पंचवटीतील मातीच्या गढीचा, रामशेजच्या लढय़ाचा, किल्लय़ावरील जीवमात्रांचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला. दुर्गाची चढाई, भटकंती, श्रमदान यामुळे आरोग्याला उत्तम स्वास्थ्य लाभते, असे मत ज्येष्ठ दुर्गभ्रमंतीकार व गोदावरी नदीचे अभ्यासक डॉ. रत्नाकर पटवर्धन यांनी व्यक्त केले.

शिवकार्य गडकोट मोहीम या संस्थेच्या वतीने येथे जिल्हा न्यायालयासमोरील शिवरायांच्या पुतळ्याजवळ दर महिन्याच्या १२ तारखेला दुर्गजागृती व्याख्यानमाला होत असते. व्याख्यानाचे नववे पुष्प डॉ. पटवर्धन यांनी ‘दुर्गाची भ्रमंती व आरोग्य’ या विषयावर गुंफले. व्याख्यानाच्या प्रारंभी युवा कलावंत संकेत नेवकर यांनी ‘जेव्हा गड बोलू लागला’ या एकपात्री प्रयोगातून गडकिल्लय़ांची व्यथा मांडली. त्यानंतर डॉ. पटवर्धन यांनी व्याख्यानात गडकिल्लय़ांकडे होत असलेल्या उदासिनतेकडे लक्ष वेधले. आजच्या पिढीला गडकिल्ले समजून घ्यावे लागतील. इतिहासाच्या अनेक वास्तू, किल्लय़ांचे बुरुज, तटबंदी, गुप्त मार्ग आज पडक्या अवस्थेत आहेत. किल्लय़ांवर, डोंगरांवर आढळणारी जैवविविधता खूप काही शिकवून जाते, असे त्यांनी नमूद केले. रामशेज किल्लय़ाचा लढा व त्यात वापरलेल्या लाकडी तोफांची माहिती त्यांनी दिली. प्रसंगावधान असलेला आपला शिवराजा आणि त्यांचे मावळे हे किती अभ्यासू होते याचा विचार करा. जवळच असलेल्या गणेशगावात मुघलांच्या ५०० घोडय़ांचा पाडाव करण्यात आला, हा इतिहासही आपण विसरलो. रामशेज लढाईवेळी तुंगलदरा येथेही इतिहासाचे अनेक प्रसंग घडले. अनेक गावांना त्यांचा इतिहास माहीत नाही. इतिहासाचे दाखले आणि जमिनीत लुप्त अनेक गोष्टी शोधून त्याचा अभ्यास करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्या भक्तिभावाने दुर्गाचे संवर्धन, भ्रमंती केली जाते त्याला अभ्यासाची जोड देण्याची सूचना त्यांनी केली.

या दुर्गजागृती व्याख्यानास गोदावरी बचाव अभियानाचे निशिकांत पगारे, प्रा. राजू देसले, नेचर क्लबचे प्रा. आनंद बोरा, शिवकार्य गडकोट मोहिमेचे संस्थापक राम खुर्दळ, मुख्य संयोजक योगेश कापसे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:35 am

Web Title: health benefits of trekking
Next Stories
1 समृद्धी विकास केंद्रांची ठिकाणे बदलण्याचा विचार
2 उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत हप्त्याने कर भरण्याची सुविधा
3 ऐन गणेशोत्सवात नऊ गावठी पिस्तुलांसह ३९ काडतुसे हस्तगत
Just Now!
X