जिल्ह्य़ात असंसर्गजन्य आजारांविषयी सर्वेक्षणह्ण

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने असंसर्गजन्य आजारांविषयी तपासणी सुरू असून जिल्ह्य़ातील तीन लाखांहून अधिक रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. यातील ३० हजारांहून अधिक रुग्णांना पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, या सव्‍‌र्हेक्षणाला आशा आंदोलनाचा फटका बसल्याने अद्याप अपेक्षित लक्ष गटापर्यंत आरोग्य विभाग पोहोचू शकलेले नाही.

आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोध अभियान आणि असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान सुरू आहे. याअंतर्गत जिल्ह्य़ात घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तीन लाख ८९ हजार ७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. असंसर्गजन्य आजार अर्थात उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग हे आजार तपासले जात आहेत. प्रामुख्याने वयोगट लक्षात घेता असंसर्गजन्य आजाराच्या धोक्यांचे मूल्यांकन मौखिक आणि कर्करोग या दोन स्तरात होत आहे.

मौखिकमध्ये वय, वजन, व्यसन करतात का, कमरेचे माप, आठवडय़ात किती वेळ व्यायाम करतात, परिवारातील कोणी सदस्य उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाने पीडित आहे का, आदी प्रश्न विचारून काही लक्षणे आढळल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले जात आहे. पाहणीत ३४ हजार ७०२  रुग्णांमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आढळल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी पाठविले जात आहे. दुसरीकडे कर्करोग तपासणीत तोंडाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयामुख कर्करोगाची पाहणी होत आहे. यामध्ये एक हजार ५२४ रुग्णांमध्ये कर्करोगसदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिली. दरम्यान, ‘आशा’ यांच्या मदतीने हे सव्‍‌र्हेक्षण होणार होते. त्यादृष्टीने आशा आणि एक स्वयंसेवक अशी पथकाची निर्मिती करून त्यांच्यावर दिवसाकाठी ३० घरे अशी जबाबदारी निश्चित करण्यात आली. परंतु, आशा सेविकांच्या आंदोलनामुळे परिचारिका आणि एमपीडब्लू सुरुवातीच्या काळात हे सव्‍‌र्हेक्षण करत होते. यामुळे लोकांपर्यंत पोहचण्यास मर्यादा आल्या. आशा पुन्हा कामावर रुजू झाल्या असल्या तरी अद्याप लक्ष गटापर्यंत आरोग्य विभाग पोहचलेले नाही. शनिवापर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून त्यानंतरच क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्णांविषयी चित्र स्पष्ट होईल.