बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे १०८ फूट उंच भगवान ॠषभदेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व महामस्ताभिषेक सोहळ्यांतर्गत सहभागी झालेल्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यासाठी वैद्यकीय मदत केंद्र सुरू करण्यात आले असून, अवघ्या पाच दिवसात दोन हजाराहून अधिक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे.

मांगीतुंगी येथे प्रशासनाने आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. सुनील पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र १८ फेब्रुवारीपर्यंत अहोरात्र कार्यरत राहणार आहे. या केंद्राची जबाबदारी २० वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १५० कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. हिवताप विभाग आणि राष्ट्रीय बालस्वास्थ आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले. मुख्य सभा मंडपाजवळ दहा खाटांचा ‘साइट आयसीयू’ कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवास व्यवस्था असणाऱ्या वसाहतीजवळ बाह्य़रुग्ण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उपरोक्त ठिकाणी भाविकांना आरोग्यसेवा दिली जात आहे. तसेच ताहाराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सटाणा व नामपूर ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच १६ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १२ रुग्णांवर जलद सेवेमुळे तातडीने उपचार करणे शक्य झाल्याचे डॉ. नीलेश सोनवणे यांनी सांगितले. आरोग्य केंद्रात प्रामुख्याने सांधेदुखी, स्नायुदुखी, ताप, सर्दीचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. तर हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या दोन रुग्णांवर प्रथमोपचार करून तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. औषधोपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. याशिवाय मांगीतुंगी येथे कार्यरत वैद्यकीय मदत केंद्राने शुद्ध पाणीपुरवठय़ाकडे लक्ष ठेवले. त्यासाठी पाण्याचे नमुने, टीसीएलच्या नमुन्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. डासांचा उपद्रव टाळण्यासाठी निवास व्यवस्थेची पाहणी करून धुरळणी केली जात आहे.