06 December 2019

News Flash

‘आरोग्यपत्रिका’ उपक्रम वर्षांपुरताच मर्यादित

दर वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांची नियमितपणे संपूर्ण वैद्यकीय तपासणीचा निर्णय घेण्यात आला.

(संग्रहित छायाचित्र)

चारुशीला कुलकर्णी

लसीकरणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांची कोणतीही आरोग्य तपासणी नाही

विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहावे, नियमितपणे बालकांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी नाशिक महापालिका शिक्षण तसेच आरोग्य विभागाच्या सहकार्याने मागील वर्षी महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आरोग्यपत्रिका’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आली. यंदा मात्र हा उपक्रम गुंडाळण्यात आला आहे. शासकीय योजनेतील लसीकरणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने या उपक्रमाच्या सद्य:स्थितीविषयी आरोग्य तसेच शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे.

तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या संकल्पनेतून महापालिकेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात ‘आरोग्यपत्रिका’ उपक्रम ऑक्टोबर २०१७ मध्ये हाती घेण्यात आला. दर वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांची नियमितपणे संपूर्ण वैद्यकीय तपासणीचा निर्णय घेण्यात आला.

आरोग्य तसेच शिक्षण विभागाच्या मदतीने या उपक्रमात महापालिकेच्या १३२ शाळांमधील २८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी महापालिकेचे आरोग्य पथक कामाला लागले. महापालिकेतील प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांची नेत्र, दंत, क्षयरोग, कर्णबधिर, कर्करोग, व्यंगासह ४२ आजारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये  काही मुलांमध्ये काही दुर्धर आजार आढळले असता तातडीने पालकांशी संपर्क साधून संबंधित विद्यार्थ्यांना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांवर राज्य शासनाच्या ‘आरोग्य महाशिबीर’ तसेच त्यानंतर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेत शस्त्रक्रिया तसेच नियमित उपचार करण्यात आले.

मात्र, सद्य:स्थितीत शहर परिसरातील महापालिकेच्या शाळांमध्ये या आरोग्यपत्रिकांचे पत्रक कपाटात धूळ खात पडले आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी शिक्षण तसेच आरोग्य विभागाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. नियमित वैद्यकीय तपासणी न करता आरोग्य विभाग केवळ गोवर, रुबेला, पोलिओ अशा विविध लसीकरण मोहिमा राबविण्यात धन्यता मानत आहे. शिक्षण विभागाला या उपक्रमाचा विसर पडला, अशी स्थिती आहे. सध्या दिवाळीची सुटी असली तरी शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात याचे नियोजन नाही.

‘आरोग्य पत्रिका’ उपक्रमाअंतर्गत मागील वर्षी महापालिकेच्या १३२ शाळांमधून २८,०६७ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत १३०० विद्यार्थ्यांना काही लक्षणे आढळली. त्यांची पुनर्तपासणी केली असता ८४४ विद्यार्थ्यांना महाशिबिरात पाठविण्यात आले. त्यातील १५९ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया आणि अन्य उपचार झाले. पुढे आरोग्य विभागाकडून पाठपुरावाही करण्यात आला. सध्या तपासणी संदर्भात नियोजन नसले तरी शिक्षण विभागासोबत काही करता येईल का ते पाहू.

– डॉ. राहुल गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, महापालिका वैद्यकीय अधिकारी

First Published on November 17, 2018 2:03 am

Web Title: health magazine activities limited to years
Just Now!
X