जळगाव जिल्ह्य़ातील महिला डॉक्टरची तक्रार

राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांनी त्यांच्या दालनात बोलावून असभ्य संभाषण केल्याची तक्रार जिल्ह्य़ातील पातोंडा येथील आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्र्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.

शासनाची कोणतीही मदत न घेता लोकसहभागातून पातोंडा येथे केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमावर आधारित डिजीटल आरोग्य केंद्र ही संकल्पना डॉ. महाजन या यशस्वीरित्या राबवित आहेत. राज्यभरात रुग्णांच्या सोयीसाठी ही योजना राबविण्यात यावी, यासंदर्भात अधिवेशन सुरू असताना आरोग्य मंत्री सावंत यांच्यासमोर योजनेचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचे खासगी सचिव सुनील माळी यांनी आपणास दालनात तब्बल दोन तास ताटकळत ठेवत आपल्या वैयक्तिक व खासगी गोष्टी विचारण्यास सुरूवात केली, असे डॉ. महाजन यांनी तक्रारीत म्हटले आहे. डॉ.महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल दि.18 जून रोजी लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. डिजीटल आरोग्य केंद्राची योजना तुम्हाला राज्यभर राबवायची असेल तर ‘गॉडफादर’ची गरज आहे. त्याशिवाय तुम्ही ही योजना शासन दरबारी राबवू शकत नाही असे माळी यांनी म्हटल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. माळी यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली  आहे. ग्रामीण रुग्णांच्या हितासाठी आवश्यक अशी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.