News Flash

सुदृढ भारतासाठी ‘विहिंप’ची आरोग्य दूत योजना

शुक्रवारी शंकराचार्य संकुल येथे विहिंपने ‘आरोग्यदूत’ या उपक्रमास सुरुवात केली.

 

रुग्णांना व्याधीमुक्त करण्याचा प्रवीण तोगडिया यांना विश्वास

एके काळी ‘आरोग्य धनसंपदा’ जपणारा भारत देश गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे विविध व्याधींनी ग्रस्त बनला आहे. यातून शारीरिक खच्चीकरण होते, मात्र व्याधी बऱ्या करण्यासाठी होणारा कालापव्यय आणि खर्च याची मोजदाद न केलेली बरी. या पाश्र्वभूमीवर, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने (विहिंप) इंडियन हेल्थ लाइनच्या माध्यमातून ‘आरोग्यदूत’ ही अनोखी संकल्पना मांडण्यात आली आहे, ज्या माध्यमातून हे दूत डॉक्टर नसले तरी रुग्णांचा जीव वाचवू शकतात, असा विश्वास विहिंपचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी शंकराचार्य संकुल येथे विहिंपने ‘आरोग्यदूत’ या उपक्रमास सुरुवात केली. या वेळी डॉ. तोगडिया, एकनाथ शेटे, रामभाऊ महाजन यांच्यासह आरोग्यदूत उपक्रमात सहभागी डॉक्टर उपस्थित होते. तोगडिया यांनी हा देश स्वस्थ लोकांचा होता, मात्र आता तो रुग्णांचा देश झाल्याचे नमूद केले. आकडेवारीच्या भाषेत १९५१ मध्ये बीपीचे रुग्ण केवळ १ टक्का होते.

आता ही संख्या २० टक्कांच्या घरात पोहोचली आहे. मधुमेहाची स्थिती अशी आहे की, आज कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मधुमेह, रक्तदाबाची तपासणी केली जाते. सध्या भारतात प्रत्येक १० व्यक्तीमागे एक व्यक्ती कोणत्या तरी आजाराने ग्रस्त आहे; पण आपणास काय त्रास होतोय, याची त्यांना कल्पना नाही. त्यातही मुले व महिला यांच्या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. मानसिक स्वास्थ-ताणतणाव यामुळेही विविध व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. भविष्यात हे चित्र विदारक राहणार असल्याची साशंकता त्यांनी व्यक्त केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी आणि वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या सर्वेक्षणात भारतात दर तीन माणसांमागे एक रुग्ण राहील अशी स्थिती काही वर्षांत येईल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीत एकटय़ा भारतात विविध आजार बरे करण्यासाठी १४ लाख करोड रुपये खर्च होत आहेत जिथे भारत देशाचे उत्पन्न केवळ १५ करोड आहे, अशा स्थितीत आरोग्यावर होणारा खर्च अवास्तव आहे. या पाश्र्वभूमीवर, विहिंपने इंडियन हेल्थ लाइनच्या माध्यमातून ‘आनंदी राष्ट्र, आरोग्यदायी राष्ट्र’ या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी देशस्तरावर ‘आरोग्यदूत’ उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर, काही सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक यांची मदत घेण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तोगडिया यांनी केले. शुक्रवारी संकुलात झालेल्या आरोग्यदूत प्रशिक्षण शिबिरात ६० प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. त्यांना तोगडिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ब्लड फॉर इंडिया

आरोग्य दुत संकल्पनेशी जोडल्या गेलेल्या आरोग्य दुतांचे नातेवाईक किंवा स्वत ओळखीतील व्यक्तीला कधी रक्ताची गरज पडली तर त्यासाठी दाता शोधण्यात त्याची भटकंती होऊ नये यासाठी अत्याधुनिक भ्रमणध्वनी संचात ‘ब्लड फॉर इंडिया’ हे सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. यामध्ये रुग्णाचे नाव, रक्त गट, कोणत्या डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत, रक्ताची गरज ही माहिती नोंदविल्यास त्याला दवाखान्यात रक्त उपलब्ध करून दिले जाईल.

काय आहे आरोग्य दुत

आरोग्य दुत उपक्रमात रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तातील साखर आणि स्थुलता या विषयी माहिती दिली जाईल. याची लक्षणे काय असतील, त्याचे परिणाम काय याविषयी मार्गदर्शन करतांना त्या तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री देण्यात येईल. प्रशिक्षणार्थीने महिन्यातील कोणत्याही एका रविवारी चार तास किंवा इच्छा असेल तर प्रत्येक रविवारी एखाद्या ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांची वर दिलेल्या आजारांची तपासणी करायची. त्यात जर कोणामध्ये ती लक्षणे आढळली तर त्याला पैसे असतील तर खासगी रुग्णालय किंवा नसतील तर इंडियन हेल्थ लाईनशी संपर्क  करून देत पुढील औषधोपचारासाठी उद्युक्त करत पाठपुरावा करावा. लवकरच महिला आरोग्य या विषयावर आरोग्य दुतच्या माध्यमातून काम सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2016 4:20 am

Web Title: health plans for vishwa hindu parishad
टॅग : Vishwa Hindu Parishad
Next Stories
1 खत प्रकल्पातील सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याचा निर्णय
2 मुख्याधिकाऱ्यांअभावी नगर पंचायतींच्या कामांना खीळ
3 नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची शतकाकडे वाटचाल
Just Now!
X