निम्मा भावही मिळणे कठीण-शेतकऱ्यांची व्यथा; द्राक्ष बागांवर रोगराईची शक्यता

वर्षभर कांद्याला भाव नव्हते. त्यामुळे आहे त्या भावात माल विकावा लागला. महिनाभरात पहिल्यांदा भाव अडीच ते तीन हजार रुपयांवर पोहोचले. यामुळे किमान आता चांगले पैसे होतील, अशी आशा होती. तथापि, अवकाळी पावसाने दगा दिला. ज्या मालास प्रति क्विंटलला अडीच हजार रुपये भाव मिळणार होता, त्यास आता कोणी ५००-६०० रुपयेही देणार नाही..

अवकाळी पावसाने कांद्यावर ओढावलेल्या संकटाचे परिणाम सटाणा तालुक्यातील शेतकरी साहेबराव कांदळकर मांडत होते. द्राक्ष उत्पादकांची यापेक्षा वेगळी अवस्था नाही. पावसाने साखर उतरलेल्या द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची तर फुलोऱ्यातील बागांना कुज, डावणीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. कांद्याप्रमाणेच द्राक्षांच्या दरावर या नुकसानीचा फटका बसणार आहे. निर्यातक्षम द्राक्षांच्या दरावर कांद्यासारखा परिणाम होणार असल्याची धास्ती उत्पादक व्यक्त करीत आहेत.

साधारणत: दीड महिन्यापूर्वी अवकाळी पावसाने जिल्ह्य़ात शेतीचे नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती ओखी चक्रीवादळामुळे झाली. नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, सटाणा, मालेगावसह आसपासच्या तालुक्यांमध्ये द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. काही भागांत पाच ते सहा तास पाऊस झाला. कांद्याच्या रोपांसह शेतात काढून ठेवलेला कांदा, मकाही भिजला. नवीन लाल कांद्याचे आयुर्मान कमी असते. त्याची साठवणूक करता येत नाही. पावसाने गुणवत्ता घसरून भाव कमी होतील, अशी उत्पादकांना धास्ती आहे. सटाण्यातील कोटवेलचे कांदळकर यांनी चार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली. निम्म्या क्षेत्रावरील माल काढणीवर आला होता. भिजल्याने तो सडण्याची भीती आहे. यामुळे अत्यल्प दरात कांदा विकणे भाग पडणार असल्याची व्यथा त्यांनी मांडली. याआधी पावसाने कांद्याचे नुकसान झाले होते. त्यावेळी माल खराब झाल्याने कमी उत्पन्न मिळाले. आता चांगले दर मिळण्याची अपेक्षा असताना तसेच संकट ओढावल्याचे त्यांनी नमूद केले. या पावसाने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसल्याचे लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. निर्यातमूल्य शून्यावरून ८५० डॉलरवर नेल्याने कांद्याची निर्यात थंडावली आहे. त्याचा परिणाम नवीन कांद्याची आवक वाढत असताना दर हजार ते बाराशे रुपयांनी कमी होऊन सरासरी अडीच हजार क्विंटलपर्यंत आला. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावला जाणार असल्याची स्थिती आहे.

द्राक्षांचीही बिकट अवस्था

द्राक्ष बागांची यापेक्षा बिकट अवस्था होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्य़ात सुमारे दोन लाख एकर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड झाली आहे. मागील पावसातून बचावलेल्या बागांची उत्पादकांनी काळजी घेऊन दर्जेदार माल तयार केला. सर्व काही सुरळीत असताना हे संकट कोसळले. ज्या बागा तयार आहेत, म्हणजे मण्यांमध्ये साखर उतरली आहे, त्यांना तापमान कमी झाल्यास तडे जाऊ शकतात. तसेच ज्या बागा फुलोऱ्यात आहे, त्या बागांतील घडांची कुज होऊ शकते. वातावरणातील बदलांमुळे अधिकची औषध फवारणी करावी लागणार असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगितले. कसमादे पट्टय़ातील द्राक्षांची सध्या काढणी सुरू आहे. निम्म्या क्षेत्रावरील म्हणजे दीड हजार एकरवरील हे काम झाले असून निम्म्या क्षेत्रावर बाकी आहे. निर्यात होणाऱ्या या द्राक्षांना ७५ ते ९० रुपये किलोचा दर मिळत आहे. देशांतर्गत बाजारात पाठविल्या जाणाऱ्या मालास ५० ते ७० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे संघाचे संचालक खंडू शेवाळे यांनी सांगितले. मण्यांना तडे जाणे वा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास द्राक्ष घडाचा चेहरामोहरा बदलतो. दिसण्यास आकर्षक नसणाऱ्या द्राक्षांना भाव मिळत नाही. मालेगावच्या दाभाडी येथे संजय देवरे यांची दहा एकर द्राक्ष बाग आहे. जिथे पाऊस पडला, त्या भागातील द्राक्षे खराब होण्याच्या भीतीने निर्यातीसाठी खरेदी होत नसल्याचे देवरे यांनी सांगितले.