News Flash

चार तालुक्यांत संततधार, सहा तालुके कोरडे

मंगळवारी दिवसभर अनेक भागांत पाऊस सुरू राहिल्याने जिल्ह्य़ातील पावसाने १० हजारांचा टप्पा ओलांडला.

पावसाने १० हजार मि.मी. टप्पा ओलांडला

नाशिक : जिल्ह्य़ातील पावसाने मंगळवारी १० हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड हजार मिलिमीटरने अधिक पाऊस झाला आहे. सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तालुक्यांत धो धो पाऊस कोसळत असताना दुसरीकडे सहा तालुक्यांत मात्र तो रिमझिम स्वरूपात पडत आहे. आतापर्यंत सर्वाधिक २४४४ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद इगतपुरीत, तर सर्वात कमी १२४ मिलिमीटर नांदगावमध्ये झाली आहे. नाशिक, दिंडोरीमध्ये तुलनेत बरी स्थिती असली तरी कळवण, मालेगाव, नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा या सहा तालुक्यांमध्ये अद्याप ३०० मिलिमीटर इतकाही पाऊस झालेला नाही.

चोवीस तासांत जिल्ह्य़ात एकूण ६५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्य़ात आतापर्यंत झालेल्या पावसाचा अभ्यास केल्यास तो पाच ते सहा तालुक्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे दिसून येते. १ जून ते ३० जुलै (सकाळपर्यंत) या कालावधीत यंदा एकूण ९९८९ मिलिमीटर पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर अनेक भागांत पाऊस सुरू राहिल्याने जिल्ह्य़ातील पावसाने १० हजारांचा टप्पा ओलांडला. त्यात नेहमीप्रमाणे इगतपुरी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वरचा क्रमांक असून तिथे १६६४ मिलिमीटरची नोंद आहे. पेठ तालुक्यात १४६१ तर सुरगाण्यात ११६१ मिलिमीटर पाऊस झाला.

पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे रखडली असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये शेत-शिवार पाण्याखाली गेले आहेत. सुरगाण्यात पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने काही भागांतील वाहतूक विस्कळीत झाली. नाशिक तालुक्यात आतापर्यंत ६०१ तर दिंडोरीत ४७२ मिलिमीटर पाऊस झाला.

गतवर्षी याच काळात सुमारे साडेआठ हजार मिलिमीटरची नोंद झाली होती. तेव्हादेखील तो पाच ते सहा तालुक्यांपर्यंतच सीमित राहिला होता. या वर्षी प्रमाण वाढूनही इतर भागांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाची नोंद

दोन महिन्यांत सिन्नर, येवला आणि बागलाण हे तीन तालुके ३०० मिलिमीटरचा टप्पा ओलांडू शकले. मालेगावमध्ये आतापर्यंत २७८, कळवण १६८, नांदगाव १२४, चांदवड २०१, देवळा १६७, निफाड २७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:15 am

Web Title: heavy rain in four talukas of nashik district zws 70
Next Stories
1 गर्भधारणेपूर्वीच उपचारामुळे सुरक्षित मातृत्वाकडे वाटचाल
2 ‘लालपरी’चा इतिहास उलगडला
3 Video : नाशकात मुसळधार पाऊस, गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी
Just Now!
X