महापुराचा तडाखा बसल्यानंतर काठालगतच्या भागात कचरा, गाळ हटविण्याचे काम प्रगतिपथावर असले तरी गोदावरीतील पाण्याच्या पातळीमुळे रामकुंड परिसरात धार्मिक विधी करताना भाविकांचे हाल होत आहेत. आसपासच्या रस्त्यांसह जिथे पाणी नाही, अशी जागा शोधून तिथे विधी करावे लागत आहे. पावसाचा जोर काही अंशी कमी झाला. २४ तासांत जिल्ह्य़ात २७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गंगापूरसह इतर धरणांतील विसर्ग कमी झाला असला तरी कायम आहे.

गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या महापुराचा तडाखा शहराला बसला होता. नदी काठावरील अनेक भागांत पाणी शिरले. पाण्यात वाहून आलेला कचरा, गाळ सर्वत्र पसरला. ज्या भागातून पाणी ओसरले, तिथे स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर हाती घेतली गेली. पण, रामकुंड परिसराचा बहुतांश भाग अद्याप पाण्याखाली आहे. देशभरातील भाविक या ठिकाणी पूजाविधी करण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी परिसरात गोलाकार खुल्या सभागृहाची व्यवस्थाही आहे. पण, हे सभागृह आणि आसपासचा बराचसा परिसर पाण्याखाली असल्याने पुरोहितांसह भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  या परिसरात वस्त्रांतरगृहाची इमारत आहे. इमारतींच्या काही पायऱ्यांपर्यंत पाणी आहे. ज्या भागात पाणी नाही, तिथे पूजाविधी सध्या सुरू आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीलगत हे काम सुरू आहे. गुरुवारी गंगापूरमधून पाच हजार १०४ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. गोदापात्रातून सात हजार ८३० क्युसेक पाणी वाहत होते. पाण्याची पातळी कमी होईपर्यंत ही समस्या कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

पावसाने कसर भरुन काढली

महिनाभर विलंबाने दाखल झालेल्या पावसाने पुढील ३० ते ४० दिवसांत संपूर्ण कसर भरून काढली. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात २७८ मिलिमीटरची नोंद झाली. एक जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्य़ात १६ हजार ६४३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात इगतपुरीमध्ये सर्वाधिक ३८६८ तर सर्वात कमी १८६ मिलिमीटर नांदगावमध्ये झाला. त्र्यंबकेश्वर ३१४०, पेठ २४४५, सुरगाणा दोन हजार ६१, नाशिक ९८६, दिंडोरी ८८४, निफाड ३७०, सिन्नर ५५०, चांदवड ३१७, देवळा २५९, येवला ४०७, मालेगाव ३६९, बागलाण ४२१ मिलिमीटर असा पाऊस झाला आहे. गुरुवारी दारणा धरणातून ५३६०, भावली २९०, गंगापूर ५१०४, नांदूरमध्यमेश्वरमधून २९ हजार ५९५ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. गौतमी, मुकणे, हरणबारीतील विसर्ग कमी झाला आहे.