24 October 2020

News Flash

जिल्ह्य़ात पावसाचा जोर कायम

गिरणासह १३ धरणांमधून विसर्ग

सोमवारी दुपारी पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. (छाया-यतीश भानू)

गिरणासह १३ धरणांमधून विसर्ग

नाशिक : शहर परिसरात सोमवारी दुपारी अकस्मात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांसह छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दोन तास पावसाने शहर परिसरास झोडपून काढले. सखल भाग आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. जिल्ह्यात २४ तासांत फारसा पाऊस झाला नव्हता. परंतु दिवसाच्या पावसाने ती कसर भरून निघाली. येवला, दिंडोरी, सिन्नर आदी भागात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब होण्याच्या मार्गावर असून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा गिरणासह एकूण १३ धरणांतूून पाणी सोडण्यात आले आहे.

गेल्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. धरणे तुडुंब झाल्यानंतर पाऊस कोसळल्यास विसर्ग करणे भाग पडते. सध्याच्या पावसाने त्याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. २४ तासांत जिल्ह्यात केवळ १३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मालेगाव, नांदगाव, चांदवड, निफाड, येवला या तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. सोमवारी वातावरणात बदल झाले. ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र अंधार पसरला होता. दुपारी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहरात दीड ते दोन तास पाऊस कोसळला. येवला तालुक्यातील ठाणगाव, सिन्नर तालुक्यातील चास परिसरात पाऊस झाला. दिंडोरी तालुक्यातील रासेगावसह आसपासच्या भागात दिवसभर संततधार सुरू होती.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागात रिपरिप सुरू होती. शहरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह बाजारपेठेतील विक्रेत्यांची धावपळ उडाली. गंगापूर रोड, कॉलेज रोड आणि काही भागात पावसाचा अधिक जोर होता. तुलनेत जुने नाशिक भागात कमी पाऊस झाला. रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्गस्थ होताना कसरत करावी लागली. गावात पावसाचा जोर नसल्याने सराफ बाजार वा तत्सम ठिकाणी पाणी साचले नाही, असे नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार २९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये नाशिक तालुक्यात ६८१, इगतपुरी ३६९३, दिंडोरी ५७७, पेठ १४९६, त्र्यंबकेश्वर १३५३, मालेगाव ७८६, नांदगाव ७६५, चांदवड ६२९, कळवण ६२८, बागलाण ८२२, सुरगाणा १३९०, देवळा ५४३, निफाड ५५६, सिन्नर ७८७, येवला तालुक्यात ५८७ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. गेल्या वर्षी याच काळात आतापर्यंत २२ हजार २३८ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा हे प्रमाण जवळपास सात हजार मिलिमीटरने कमी आहे. परंतु, जिल्ह्याची पावसाची टक्केवारी १०१.९४ गाठली गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांमधून विसर्ग करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:16 am

Web Title: heavy rains continue in the nashik district zws 70
Next Stories
1 मराठा आरक्षणास काही मंत्र्यांचा विरोध
2 करोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा
3 त्र्यंबकेश्वर परिसरात रानफुलांना बहर
Just Now!
X