26 May 2020

News Flash

दिमाखदार निशाण प्रदान सोहळा

संबंधित विभागास एकदाच हा बहुमान मिळतो. हे निशाण त्या दलाची ओळख बनते. राष्ट्रभक्तीच्या भावनेला ते जागृत ठेवण्याचे काम करते.

 

राष्ट्रपतींच्या उपस्थितीने गौरवात भर;  हेलिकॉप्टरकडून  मानवंदना; संचलन आणि बॅण्ड पथकाची धून

आकाशातून हेलिकॉप्टरने मानवंदना, दिमाखदार संचलन, बँड पथकाची अनोखी धून, धर्मगुरूंच्या उपस्थितीत शुद्धीकरण.. अशा उत्साहाने भारलेल्या वातावरणात गुरुवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते  लष्कराच्या हवाई विभागास करडय़ा रंगातील निशाण (ध्वज) बहाल करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलेल्या अधिकाऱ्यांनी निशाणला सलामी दिली. शिवाय सामान्य नागरिकांनी उभे राहत आदरभाव प्रगट केला.

युद्धभूमीवर सेना विशिष्ट रंगाचा ध्वज घेऊन लढते. सैन्यातील एखादा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर राष्ट्रपतींकडून त्यास निशाण देऊन सन्मानित करण्याची प्रथा आहे. संबंधित विभागास एकदाच हा बहुमान मिळतो. हे निशाण त्या दलाची ओळख बनते. राष्ट्रभक्तीच्या भावनेला ते जागृत ठेवण्याचे काम करते.

१ नोव्हेंबर १९८६ रोजी स्थापन झालेल्या लष्करी हवाई दलास ३३ व्या वर्षी हे निशाण प्राप्त झाले. गांधीनगरच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या मैदानावर दिमाखात हा सोहळा पार पडला. बुलेटवर आरूढ जवान आणि मागे सुरक्षा दलांची वाहने असा राष्ट्रपतींच्या ताफ्याचा बाज होता.

सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. लष्करप्रमुख बिपीन रावत आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी कोविंद यांचे स्वागत केले.

राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारे निवेदन, हे या सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले. कोविंद यांनी प्रथम पर्यावरणस्नेही वाहनातून संचलनाची पाहणी केली. नंतर मैदानावरील शामियान्यात ते स्थानापन्न झाले. सुभेदार राजेशकुमार हे निशाण घेऊन मैदानावर आले. लष्करी बँड पथकाने राष्ट्रपतींसमोर मोकळ्या जागेतील ‘ड्रम’वर ठेवले. धर्मगुरूंच्या उपस्थितीत शुद्धीकरण करण्यात आले. कोविंद यांच्या हस्ते

करडय़ा रंगातील निशाण लष्करी हवाई विभागास बहाल करण्यात आला.

आर्मी एव्हिएशन स्कूलचे प्रमुख सरबजित सिंग बाबा भल्ला यांच्या नेतृत्वाखाली शानदार संचलन झाले. विशेष म्हणजे, काही तुकडय़ांचे कॅप्टन गरिमा कुलकर्णी, जगमित कौर, ए. बलहारा, कॅप्टन ईशा ठाकूर या महिला अधिकाऱ्यांनी नेतृत्व केले.

दलास प्राप्त झालेल्या निशाणला उपस्थितांनी मानवंदना दिली. अधिकारी-जवानांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवून मनोबल उंचाविण्याचे कार्य हे निशाण करणार असल्याची भावना व्यक्त झाली. संचलनावेळी आकाशातून तीन हेलिकॉप्टर राष्ट्रध्वज, भारतीय लष्कराचा ध्वज, हवाई दलाचे निशाण फडकावत मार्गस्थ झाली. या सोहळ्यास लष्करी हवाई

विभागातील आजी-माजी

अधिकारी, कुटुंबीयांसह मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आमदार सीमा हिरे यांनी देखील या सोहळ्याची अनुभूती घेतली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे आदी उपस्थित होते.

वैमानिक, अधिकारी-जवानांच्या कामाचे फलित

युद्ध आणि शांतता काळात लष्कराच्या हवाई विभागाने बजावलेल्या कार्याचा गौरव राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात आल्याचे दलाचे महानिर्देशक कर्नल कमांडंट जनरल कंवलकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. १९८६ मध्ये लष्करात हवाई दलाची स्थापना झाली. अतिशय कमी काळात दलाने उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. आजवर देशातील आणि परदेशातील मोहिमांमध्ये दलाने सहभाग घेतला. दलातील वैमानिक, अधिकारी आणि जवानांच्या कामाचे हे फलित आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल आजपर्यंत दलास २७३ पदकांनी सन्मानित करण्यात आल्याचे कंवलकुमार यांनी सांगितले.

छायाचित्र टिपण्याची चढाओढ

शहरातील सैन्य दलाच्या आस्थापनेतील कार्यक्रमास खुद्द सरसेनापती तथा राष्ट्रपती उपस्थित राहण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. यामुळे राष्ट्रपतींना पाहण्यासह त्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी लष्करी जवानांमध्ये चढाओढ पाहायला मिळाले. सकाळी राष्ट्रपती कोविंद यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. विविध कामांची जबाबदारी सांभाळणारे जवान भ्रमणध्वनी घेऊन राष्ट्रपतींची छबी टिपू लागले. राष्ट्रपती स्थानापन्न होईपर्यंत ही स्पर्धा सुरू होती. यामध्ये अधिकाऱ्यांचे कुटुंबीय सहभागी होते. सोहळा संपल्यानंतर मैदानावरील हेलिकॉप्टरसोबत छायाचित्र काढण्याचा मोह बंदोबस्तावरील पोलिसांना आवरता आला नाही. लष्करी अधिकाऱ्यांचे कुटुंबीय सरसावले. कोणी सहकुटुंब ‘सेल्फी’ काढले तर कोणी वैयक्तिक छायाचित्रास पसंती दिली. लष्करी हवाई दलात नव्याने दाखल झालेले ‘रुद्र’ हेलिकॉप्टर सर्वाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. काळ्या रंगातील हेलिकॉप्टरसोबत छायाचित्र काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2019 1:56 am

Web Title: helicopter band squad akp 94
Next Stories
1 राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्यात पोलिसांची परीक्षा!
2 स्टेट बँकेला पावणेचार कोटींचा गंडा
3 फ्रान्सिस दिब्रिटो यांचा उद्या नागरी सत्कार
Just Now!
X