• सर्वसामान्यांचे योगदान अन् संवेदनशीलताही
  • सामाजिक संस्था, संघटनांकडून जीवनावश्यक वस्तू जमा
  • वैद्यकीय पथकही कोल्हापूर, सांगलीला रवाना

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वपक्षीयांच्या लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून पंचवटीकरांच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. याद्वारे आर्थिक निधी तसेच

विविध वस्तूंचे संकलन करण्यात आले. वस्तू स्वरूपातील ही मदत सोमवारी रवाना करण्यात आली. पूरग्रस्तांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्ह्य़ाचे वैद्यकीय पथकही रवाना झाले.

राधालक्ष्मी फाऊंडेशनच्या आवाहनांतर्गत अवघ्या दोन दिवसांत अन्नधान्य, तेल, खाद्य पदार्थासह, ५०० बिस्किट पाकिटे, साडेतीन हजार पाण्याच्या बाटल्या, साडय़ांसह लहान मुलांचे कपडे संकलित झाले. वीजपुरवठय़ाअभावी अंधारात बुडालेल्या त्या भागासाठी कोणी मेणबत्त्या दिल्या, तर कोणी काडीपेटय़ांची पूर्तता केली. इतकेच नव्हे, तर महिलांसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन’ची मदत मिळाली असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी देशपांडे यांनी सांगितले. सोमवारी सकाळी मालमोटारीद्वारे हे साहित्य सांगली, कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत देशपांडे, तानाजी जायभावे, शैलेंद्र गायकवाड, सुवर्णा मोरे, योगिता आहेर, सचिन बोधले आदींनी परीश्रम घेतले. मदत साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहराचे माजी पोलीस आयुक्त तथा औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांचे सहकार्य मिळाल्याचे देशपांडे म्हणाल्या.

शहरी, ग्रामीण भागात विविध संस्थांच्या माध्यमातून मदत साहित्य संकलन केले जात आहे. त्यास सामान्यांकडून भरीव योगदान मिळाले. कामगारवर्ग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला. आपापल्या भागात अन्नधान्य, नवीन कपडे, टूथपेस्ट, ब्रश आदी जीवनावश्यक साहित्य संकलित करून ते खूटवडनगर येथील सिटू कामगार भवन येथे जमा करावे, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, अ‍ॅड्. वसुधा कराड आदींनी केले. राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक सांगली, कोल्हापूरकडे रवाना झाले. आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, मॅग्मोचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश आहेर आदींनी पथकाला शुभेच्छा दिल्याची माहिती पथकातील डॉक्टर प्रदीप जायभावे यांनी दिली.

पंचवटीतील फेरीतही रोकड, धनादेशासह विविध मदत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोमवारी सकाळी सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्था-संघटना यांच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली. पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फेरीला सुरुवात झाली. मालेगाव स्टँड, मखमलाबाद नाका, पेठ फाटा, निमाणी, सेवाकुंज, पाथरवट लेनमार्गे पंचवटी कारंजा येथे फेरीचा समारोप झाला. भाजपचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती उद्धव निमसे, सुनील बागूल यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले. निमसे हे मदतपेटी घेऊन व्यापारी, नागरिकांसमोर फिरत होते. रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांनी आपापल्यापरीने आर्थिक योगदान दिले. व्यापारी वर्गाने धनादेश दिले. स्थानिक रहिवाशांनी दैनंदिन जीवनावश्यक गरजेच्या वस्तू अर्थात धान्य, तेल, खाद्यपदार्थ, कपडे आदी विविध प्रकारची मदत दिल्याचे तुषार जगताप यांनी सांगितले. फेरी संपल्यानंतरही अनेकांनी मदतीची इच्छा दर्शविली. यामुळे तीन दिवस निमाणी मंगल कार्यालयात मदत संकलित केली जाणार आहे. इच्छुकांनी तिथे मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले. संकलित होणारी मदत १५ ऑगस्ट रोजी पूरग्रस्तांसाठी पाठविण्याचे नियोजन आहे.