नमाज पठणात पूरस्थिती निवारणार्थ प्रार्थना

बकरी ईदनिमित्त सोमवारी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाजपठण करण्यात आले. कोल्हापूर, सांगली भागांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहंशाह नाशिक मदत निधी समितीच्या माध्यमातून आर्थिक निधीच्या उभारणीला मैदानावरून सुरुवात करण्यात आली. पूरस्थिती निवारणासाठी मुस्लीम बांधवांनी विशेष प्रार्थना केली.

यानिमित्त सकाळी त्र्यंबक रस्त्यावरील ईदगाह मैदानावर खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरीत्या नमाजपठण करण्यात आले.  पश्चिम महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत आलेल्या नैसर्गिक आपत्तीचे लवकर निवारण व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहंशाह नाशिक मदत निधी समितीच्या माध्यमातून निधी संकलित करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात ईदगाह मैदानावरून करण्यात आली. पुढील काही दिवस निधी संकलन केले जाईल.

नंतर हा संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले. अनेक वर्षांपासून या सोहळ्याचे सूत्रसंचालन धार्मिक नेते हाजी सय्यद मीर मुख्तार करतात. प्रकृती अस्वास्थामुळे ते यंदा उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सूत्रसंचालन नूर महंमद यांनी केले.