News Flash

असंवेदनशीलतेत माणुसकीचा झरा

रिजवान नसीर सय्यद यांच्या प्रयत्नांनी महिलेस जीवदान

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून बेवारस महिलेला रुग्णालयात नेताना रिजवान नसीर खान आणि सहकारी.

गायत्री पारख, रिजवान नसीर सय्यद यांच्या प्रयत्नांनी महिलेस जीवदान

तापमान पुन्हा एकदा नीचांकी पातळीवर पोहोचल्याने थंडीने गारठलेल्या नाशिकमध्ये माणूसकी अन् संवेदनशीलताही जणू गोठल्याचे उदाहरण अनुभवयास मिळाले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर कडाक्याच्या थंडीत गारठलेल्या बेवारस महिलेची वेदना भ्रमंतीसाठी येणाऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. गायत्री पारख मात्र त्यास अपवाद ठरल्या. त्यांनी या महिलेच्या मदतीसाठी शासकीय रुग्णालय आणि १०८ क्रमांकाशी संपर्क साधून रुग्णवाहिका मिळविण्याची धडपड केली. परंतु, शासकीय यंत्रणेच्या अनास्थेचे दर्शन घडले. या स्थितीत सय्यद तुराबअली बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रिजवान नसीर खान मदतीला धावून आले. उभयतांनी भद्रकाली पोलिसांच्या सहकार्याने दोन ते अडीच तास प्रयत्न करीत बेवारस महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करत थिजलेल्या वातावरणात संवेदनशीलता जिवंत असल्याचे दाखवून दिले.

मागील आठ ते दहा दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीची लाट आली असून गेल्या बुधवारी हंगामातील ज्या ८.२ अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली, तेच तापमान सोमवारी पुन्हा एकदा नोंदले गेले. गारठून टाकणाऱ्या थंडीने सर्वाना हुडहुडी भरली आहे. वातावरणात कमालीचा गारवा असल्याने दिवसाही उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागतो. एरवी रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत गजबजणाऱ्या बाजारपेठेत लवकर सामसूम होत आहे. या वातावरणात उघडय़ावर खितपत पडलेल्यांची काय अवस्था होईल, हे  काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्प येथे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवरून समोर आले होते. जिल्हा प्रशासन बेवारस, घर नसलेल्यांकरिता निवारागृहांची व्यवस्था असल्याचा दावा करते. मात्र, कडाक्याच्या थंडीत अनेक जण उघडय़ावर वास्तव्यास असल्याचे दृष्टिपथास पडते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानालगत थंडीने गारठलेली बेवारस महिला हे त्याचे प्रातिनिधीक उदाहरण. या मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर शहरवासीयांची मोठी गर्दी असते. स्थानिक नगरसेवक, आमदारांसह बडे व्यावसायिक, डॉक्टर अशी सर्वच क्षेत्रातील असामी सकाळी किंवा सायंकाळी भ्रमंतीसाठी येतात. काही दिवसांपासून मैदानावर खितपत पडलेल्या महिलेकडे कोणाचे लक्ष गेले नाही, किंबहुना लक्ष जाऊनही दुर्लक्ष करण्याचे धोरण अनुसरली गेले.

या ठिकाणी भ्रमंतीसाठी येणाऱ्या गायत्री पारख यांना त्या महिलेची गंभीर अवस्था लक्षात आली. तातडीने वैद्यकीय उपचार न मिळाल्यास तिचा मृत्यू होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी रुग्णांना मोफत शासकीय रुग्णांलयांमध्ये नेण्याची व्यवस्था असणाऱ्या १०८ क्रमांकावर संपर्क साधला. बेवारस महिलेची अवस्था कथन केली. पण चालकाने रुग्णवाहिका आणण्यास नकार दिला. यामुळे पारख यांनी शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधला. मात्र, उपयोग झाला नाही. शासकीय व्यवस्थेच्या असंवेदनशीलता अनुभवणाऱ्या पारख यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून सय्यद तुराबअली बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रिजवान नसीर खान यांच्याशी संपर्क साधला. ही संस्था शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मदतीबरोबर बेवारस व्यक्तींच्या मृतदेहांचे विधिवत अंतिम संस्कार करण्याचे काम करते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा दररोज अनुभव घेणारे खान हे स्वत: अपंग असूनही त्यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न केला. १०८ क्रमांकावरून बेवारस रुग्णांना नेता येणार नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. मैदानावर खितपत पडलेल्या बेवारस महिलेची माहिती अखेर पोलिसांना कळविण्यात आली. भद्रकाली पोलिसांच्या सहकार्याने रिजवान खान आणि गायत्री पारख यांनी दुपारी बारा वाजता रुग्णवाहिकेद्वारे या महिलेला शासकीय रुग्णालयात नेले. विहित प्रक्रिया पूर्ण करीत महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मैदानावर भ्रमंतीसाठी येणाऱ्या बहुतेकांनी थंडीत गारठलेल्या महिलेकडे कानाडोळा केला, तशीच कार्यशैली १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची जबाबदारी असणाऱ्या व्यवस्थेसह शासकीय रुग्णालयाने अधोरेखित केली. या वातावरणात संवेदनशीलता, माणुसकीचा दीप गायत्री पारख, रिजवान खान यांनी तेवत ठेवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 1:52 am

Web Title: help to needy women in nashik
Next Stories
1 भुजबळ समर्थकांची भाजपविरोधात निदर्शने
2 अलीकडेच दोन दुर्घटना घडूनही नाशिकमध्ये उपायांना तिलांजली
3 मद्यधुंद वाहनचालकांविरुद्ध गुन्हे
Just Now!
X