श्रावणी अमावस्या अर्थात बैल पोळानिमित्त घरोघरी बैलांची प्रतिकृती असलेल्या मातीच्या बैलाची पूजा केली जाते. यंदा जिल्ह्य़ात झालेला मुसळधार पाऊस, मातीला आलेला भाव पाहता बाजारात सध्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार केलेल्या बैलांपेक्षा मातीच्या बैलांना अधिक भाव आहे. मातीपासून तयार केलेल्या बैलांपेक्षा पीओपीचे बैल आकर्षक दिसत असल्याने आणि किमतीनेही कमी असल्याने ग्राहकांचा कल पीओपीच्या बैलांकडे अधिक आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या जोरदार पावसाचा फटका अनेकांना बसला. पूरग्रस्त आपल्या संसाराची घडी बसविण्यात व्यस्त असताना पुरामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यंदा पुरामुळे मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी ‘छिडी’ माती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बाजारात ही माती मागणीपेक्षा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी, मागील वर्षांच्या तुलनेत पोत्यामागे या मातीचे दर २०० रुपयांनी वाढले. दुसरीकडे, बदलत्या वातावरणामुळे तयार झालेले मातीचे बैल सुकत नाही. त्यांना योग्य पद्धतीने रंग बसत नाही. तडे जातात. अशा वेगवेगळ्या समस्यांना बैल तयार करणाऱ्या आणि रंगकाम करणाऱ्या व्यावसायिकांना तोंड द्यावे लागत आहे.
मागील वर्षी पीओपीचा दर पाहता आम्ही मातीपासूनच बैल तयार करत होतो. यावेळी मात्र पुराने सर्व चित्र बदलले आहे. मातीचे बैल बनविण्यासाठी बाजारात पुरेशा प्रमाणात माती आली नाही. परिणामी मातीचे दर वाढले.
तुलनेत रंग आणि अन्य सामानाचे दर वाढल्याने मातीच्या बैलांची किंमतही वाढली. तयार मातीचे बैल शेकडय़ाने विकत असताना त्याचे दर प्रति शेकडा १०० ने वाढल्याचा परिणाम विक्रेत्यांकडून होणाऱ्या मागणीवर झाला आहे.
दुसरीकडे, पीओपीचे दर स्थिर आहेत. पीओपीचे मातीच्या बैलांपेक्षा सुबक आणि आकर्षक दिसत असल्याने ग्राहकांचा कल पीओपीच्या बैलांकडे असल्याचे अष्टेकर यांनी सांगितले. या सर्वाचा विचार करता बैल तयार करणाऱ्यांनी यंदा पीओपीचे बैल तयार करण्यास अधिक प्राधान्य दिल्याचे निर्मला अष्टेकर यांनी सांगितले.
दरम्यान, पोळ्यानिमित्त शहरातील बोहारपट्टीसह गोदाकाठावरील बाजारपेठेत बैल सजावटीसाठी लागणाऱ्या घुंगराच्या माळा, रंग, रंगीत झिरमाळ्या, झुल, रंगीत कपडे, घंटा आदी सामान आले असून सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2019 12:50 am