इंजेक्शनसाठी चार हजार ‘ई मेल’; प्रशासकीय दाव्यानंतरही तुटवडय़ाचे संकट

नाशिक : रेमडेसिविरच्या प्रचंड तुटवडय़ामुळे आठवडाभर उद्भवलेल्या परिस्थितीवर नव्या वितरण व्यवस्थेद्वारे यशस्वी तोडगा काढला गेल्याचा दावा प्रशासनाकडून होत असला तरी काही रुग्णालयांना मागणीनुसार इंजेक्शन मिळाले नसल्याचा सूर उमटत आहे. बहुदा त्यामुळे या व्यवस्थेत रुग्णालयांसाठी प्रशासनाने जो मेल जाहीर केला, तिथे रुग्णाच्या नातेवाईकांकडून मागणीचा भडिमार सुरू झाला आहे. इंजेक्शनसाठी तब्बल चार हजार वैयक्तिक पातळीवर इ मेल आल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी मागील आठवडय़ात औषध दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. आता तीच स्थिती प्रशासनाच्या ई मेलवर झाल्याचे चित्र आहे.

मागील काही दिवसांपासून रेमडेसिविरच्या तुटवडय़ामुळे रुग्णालयांसह रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी बाधितांच्या नातेवाईकांच्या अनेक दिवस रांगा लागल्या. आंदोलन झाले. खासगी रुग्णालयांनी रेमडेसिविर, प्राणवायू न मिळाल्यास उपचार करणे अशक्य असल्याचे सूचित केले होते. या काळात इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचे उघड झाले. इंजेक्शनसाठी रांगा लागू नये म्हणून प्रशासनाने करोना रुग्णालयांसाठी काही नियमावली निश्चित केली. इंजेक्शनचा पुरवठा, वितरण सुरळीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. जास्त गंभीर रुग्णांना इंजेक्शन देता यावे म्हणून रुग्णालयांनी विशिष्ट तक्त्यात माहिती भरून प्रशासनाच्या इ मेलवर मागणी नोंदविण्यास सांगण्यात आले. इंजेक्शन ज्या रुग्णासाठी वापरले जाणार, त्यांचे नांव औषधावर लिहिणे, औषध वापरून झाल्यावर रिकाम्या बाटल्या जतन करणे आणि भरारी पथकास तपासणीसाठी उपलब्ध करण्याचे बंधन टाकण्यात आले.

ही नवीन वितरण पध्दती पहिल्या दिवशी यशस्वी झाली, ज्या रुग्णालयांनी विहित पद्धतीत  मागणी नोंदविली, त्या सर्वाना रेमडेसिविर देणे शक्य झाल्याचा दावा प्रशासनाने केला. पहिल्या दिवशी जिल्ह्यतील १०१ रुग्णालयांना चार हजार १५३ इंजेक्शन वितरित करण्यात आले. त्याची यादी जाहीर करण्यात आली.

रेमडेसिविरचा तुटवडा असेपर्यंत ही कार्यपध्दती योग्य असल्याचे रुग्णालय संघटनेचे पदाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांनी म्हटले आहे. रेमडेसिविरच्या वितरणाबाबत फारशा तक्रारी संघटनेकडे आल्या नसल्याचे ते म्हणाले. तथापि, काही रुग्णालयांना मागणीप्रमाणे इंजेक्शन न मिळाल्याची तक्रार होत आहे. देवळाली सुपर स्पेशालिटी रुग्णालयास अतिदक्षता विभागातील नऊ रुग्णांसाठी रात्री २० इंजेक्शन मिळाली. रुग्णालयात ४२ रुग्ण प्राणवायू व्यवस्थेवर आहे. त्यांना इंजेक्शनची निकड असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. संबंधितांना दुसऱ्या दिवशीच्या त्या रुग्णांची नावे यादीत समाविष्ट करण्यास सांगण्यात आले. काहींना मागणी नोंदवूनही इंजेक्शन मिळाली नाहीत.

प्रशासनाच्या इ मेलवर रुग्णालयांनी मागणी नोंदविणे बंधनकारक आहे. परंतु, वैयक्तिक पातळीवर रुग्णाचे नातेवाईक रेमडेसिविरची मागणी करीत आहेत. असे तब्बल चार हजार वैयक्तिक मेल आल्याने रुग्णालयांचे मेल आणि वैयक्तिक मेल यांची विभागणी करताना नियंत्रण कक्षाची दमछाक झाली. इतक्या मोठय़ा संख्येने मेल प्राप्त होणे म्हणजे अनेक रुग्णांना इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे अधोरेखित होत आहे.

व्यक्तिगत ई-मेलला औषध मिळणार नाहीत

रेमडेसिविरच्या मागणीसाठी दिलेला ई- मेल हा केवळ रुग्णालयांसाठी आहे. त्यावर आज खासगी व्यक्तींनी जवळपास चार हजार ई-मेल व्यक्तिगत मागणीच्या केल्या आहेत. हे अपेक्षित नाही. त्यामुळे कक्षाचा वेळ जात आहे. नागरिकांनी असे करू नये. व्यक्तिगत ई-मेलला औषधे मिळणार नाहीत.

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)