निफाड, चांदवडच्या बाधित शेतकऱ्यांचा इशारा

जिल्ह्य़ातील निफाड व चांदवड तालुक्यात अतिउच्च दाबाच्या वीजवाहिनीसाठी मनोरे उभारण्याच्या कामात द्राक्ष बागांसाठी प्रारंभी ७३.८० पैसे किलो दराने नुकसानभरपाई दर्शवत प्रत्यक्षात मोठी कपात करून केवळ १२ ते १५ रुपये प्रति किलो या दराने मूल्यांकन केले गेल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या मनोरे उभारण्याच्या कामात योग्य ती नुकसानभरपाई न मिळाल्यास कुटुंबासह गुरुवारी आत्मदहन अथवा आमरण उपोषण करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन निफाड, चांदवड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून पॉवर ग्रीडच्या मनोरे उभारण्याचा विषय गाजत आहे. ही कंपनी औरंगाबाद ते भोईसर या दरम्यान ४०० केव्ही उच्च दाबाच्या वाहिनीसाठी नाशिक जिल्ह्य़ात मनोरे उभारत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागाही तोडल्या जात आहे. शेतकऱ्यांची परवानगी नसताना पोलीस यंत्रणेचा धाक दाखवून पंचनाम्यावर बळजबरीने स्वाक्षरी घेण्यात आल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांचा मनोरे उभारण्यास विरोध नाही. नुकसानभरपाई देण्यात अवलंबिलेल्या प्रक्रियेवर संबंधितांचा आक्षेप आहे.

कृषी व महसूलच्या अधिकाऱ्यांनी द्राक्ष बागाच्या नुकसानीपोटी ७३.८० पैसे प्रति किलो दर दिला जाईल, असे सांगितले होते. परंतु ही भरपाई देताना प्रत्यक्षात इतकी कपात केली जाते की, तो केवळ १२ ते १५ रुपये दर मिळतो. या पद्धतीने नुकसानभरपाईचे मूल्यांकन करून अधिकाऱ्यांनी क्रूर चेष्टा केल्याचा आक्षेप निवेदनात नोंदविला आहे.

ज्या जागेवर मनोरा उभा राहणार, त्या बाधित जागेसाठी कोणतीही भरपाई न देता केवळ पिकांची नुकसानभरपाई दिली जाते. पूर्वी द्राक्ष बाग लागवडीसाठी आलेला खर्चही त्यात धरला जात नाही. फळ धारणेपासून त्याची वयोमर्यादा तीन ते १५ वर्षे अशी धरलेली आहे. त्यात आधी द्राक्ष बागेसाठी केलेली मेहनत, उभारणीसाठी केलेली व्यवस्था, अँगल व तारा, बांबू यांचाही खर्च त्यात समाविष्ट केला जात नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

कपात करून दिला जाणारा दर बाधित शेतकऱ्यांना मान्य नसून कोणतीही कपात न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे संबंधितांनी निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच बाधित शेतकरी आपापल्या जमिनीवर आत्मदहन किंवा आमरण उपोषण करतील, असा इशारा संबंधितांनी दिला आहे.