पारा सहा अंशावर, दोन-तीन दिवस स्थिती कायम

नाशिक : गारठलेल्या नाशिकमध्ये शुक्रवारी तापमान आणखी खाली घसरून सहा अंशावर आल्याने सर्वत्र हुडहुडी भरली आहे. कडाक्याच्या थंडीला धुक्याच्या दुलईची साथ मिळाली. महामार्ग तसेच ग्रामीण भागात परिसर धुक्यात लुप्त झाल्याने वाहतूक संथ झाली. वाऱ्याचा वेग ताशी चार किलोमीटर असल्याने दिवसभर गारव्याची अनुभूती मिळत आहे. वातावरणातील हे बदल पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी नऊ फेब्रुवारीला चार अंश या नीचांकी पातळीची नोंद झाली होती. यंदा तो विक्रम मोडीत निघतो काय, याविषयी उत्सुकता आहे.

गुरूवारी ९.८ अंश नीचांकी पातळी गाठणाऱ्या तापमानात दुसऱ्या दिवशी ३.८ अंशाने घसरण झाली. उत्तर भारतातील शीतलहरींच्या प्रभावाने तापमान कमालीचे घटले. हंगामात पहिल्यांदा कडाक्याच्या थंडीची लाट नाशिक जिल्ह्य़ात अनुभवण्यास मिळत आहे. थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये थंडी नवीन नाही. डिसेंबर-जानेवारीत दोन-तीन वेळा थंडीची लाट येते. डिसेंबरमध्ये तापमान १० अंशाच्या आसपास असते. या वर्षी मात्र ती पातळी गाठण्यास जानेवारीच्या मध्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. आता तापमान इतके खाली गेले की, सर्व कसर भरून निघाली.

कमालीच्या गारठय़ाने सकाळी घराबाहेर पडणारे विद्यार्थी, चाकरमानी हबकले. ऊबदार कपडे परिधान करूनही गारवा कमी होत नव्हता. सकाळी बहुतांश भाग धुक्याने झाकाळून गेला. परिसराला जणू काश्मिर सारखे स्वरूप प्राप्त झाले. परिसर धुक्याच्या दुलईत हरवल्याचा परिणाम रहदारीवर झाला. वाहनांचे दिवे सुरू करूनही समोरील काही दिसत नव्हते. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक होती. वातावरणात पुढील दोन-तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

२०१८ मध्ये २५ जानेवारी रोजी ७.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्याआधी म्हणजे २०१७ मध्ये ११ जानेवारीला ५.८ अंश या नीचांकी तापमानाची नोंद आहे. तीन वर्षांत नीचांकी पातळी गाठण्याचा काळ जानेवारी, फेब्रुवारी असल्याचे लक्षात येते. सध्या तापमान सहा अंशावर असले तरी पुढील दोन-तीन दिवसातील घडामोडींवर त्याचे चढ उतार अवलंबून आहेत. रब्बी पिकांना हे वातावरण लाभदायक आहे. परंतु, थंडीचा तडाखा कायम राहिल्यास द्राक्ष बागांना त्याचा फटका बसण्याची धास्ती आहे.

ग्रामीण भागांत तडाखा अधिक

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक आहे. निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर २.४ अंशाची नोंद झाली. हवामानशास्त्र विभागाचे ग्रामीण भागात केंद्र नाही. ग्रामीण भागातील अन्य संस्थांच्या नोंदी ते गृहीत धरत नाहीत. थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात शेकोटींचा आधार घेतला जात आहे. द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. ही स्थिती कायम राहिल्यास द्राक्ष मण्यांना तडे जाणे, पाने-मुळांचे काम मंदावणे असे प्रकार वाढतील. काही शेतकरी चिपाडे पेटवून बागांमध्ये उष्णता तयार करीत आहेत. ही थंडी गहू, कांदा, हरबरा पिकासाठी पोषक असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात.

जनजीवन विस्कळीत

वाढत्या थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळी उशिरानंतर गजबजलेली बाजारपेठ, रस्त्यांवर सामसूम होऊ लागते. प्रवासावर थंडीचा परिणाम झाला आहे. सकाळी रेल्वे आणि बस स्थानकात शुकशुकाट दिसून येतो. विद्यार्थी, चाकरमान्यांना कडाक्याच्या थंडीला तोंड द्यावे लागत आहे.