चारुशीला कुलकर्णी

उद्योग मेळाव्यांमध्ये तीनशेहून अधिक जणांना रोजगार

शासनाच्या वतीने होणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांपेक्षा उद्योग व्यवसायातील विविध विभागात सहायक म्हणून काम करणाऱ्या १०वी किंवा आयटीआय उमेदवारांना अधिक मागणी होत आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात झालेल्या मेळाव्यांमध्ये एकंदरीत हेच चित्र पुढे येत आहे. या उद्योग मेळाव्यांमध्ये तीनशेहून अधिक जणांना रोजगार मिळाला आहे.

बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शासन विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहे. उद्योजकांसोबत करार करत याअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्याने उद्योग, वैद्यकीय, शिक्षण यासह अन्य वेगवेगळ्या क्षेत्रांतील गरजा लक्षात घेऊन कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.

वास्तविक रोजगार मेळाव्यांमध्ये हौशी तसेच गरजू उमेदवार सहभागी होतात. काहींना मेळावा कसा असतो, मुलाखत कशी द्यायची याचा सराव करायचा असतो. समोरील व्यक्तीच्या उमेदवार म्हणून आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा, आपल्या क्षमता यांचा ताळमेळ बसतो की नाही याचा अंदाज काहींना घ्यायचा असतो. काही केवळ आई-वडिलांनी सांगितले म्हणून मेळाव्यात सहभागी होतात. एक घटक असा असतो की, ज्याला खरेच कामाची गरज आहे. त्यासाठी अनुभव महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन पडेल ते काम करण्याची त्याची तयारी असते. अशाच उमेदवारांना संस्था, कंपन्यांकडून प्राधान्य दिले जाते. ते कामांविषयी एकनिष्ठ असतात तसेच मोबदल्याविषयी त्यांच्या फारशा काही अपेक्षा नसतात, याकडे स्वयंरोजगार मार्गदर्शनचे ए. आर. तडवी यांनी लक्ष वेधले.

उलट उच्चशिक्षित, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना कमी वेळात जास्त मोबदला हवा असतो. त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची मानसिक स्थिती नसते. मेळाव्यातून नोकरीत रुजू होताना मिळणाऱ्या पगाराइतकी रक्कम त्यांचा महिन्याचा वरवरचा खर्च असतो. प्राथमिक निवड झाल्यावर मुलाखत घेणाऱ्यांना कामाचे स्वरूप कसे, कोणत्या सुविधा देणार, कामाच्या वेळा कशा असतील, पगार किती असेल, अशी विचारणा सातत्याने सुरू असते. यामुळे मेळाव्यात १० वी, आयटीआय  किंवा किमान कौशल्य प्राप्त असलेल्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार होतो. अशा उमेदवारांना कामाची संधी दिली जाते. त्यांचे काम पाहून त्यांचे वेतन ठरावीक कालावधीनंतर वाढविले जाते किंवा त्यांना कामावर कायम केले जात असल्याचे डाटा मॅटिक्सचे उदय देशमुख यांनी सांगितले.

निवड आणि प्रत्यक्ष रुजू याबाबत संभ्रम

नाशिक जिल्ह्य़ात दोन वर्षांत १४ मेळावे झाले. विविध क्षेत्रातील २२८ संस्था, कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. दुसरीकडे १३ हजार ४९३ बेरोजगारांनी आपले नशीब पडताळण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी चार हजार ३२८ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. त्यातील केवळ २२८ उमेदवार हे प्रत्यक्ष कामावर रुजू झाल्याची माहिती कौशल्यविकासचे सहायक संचालक संपत चाटे यांनी दिली. प्रत्यक्ष रुजू होणाऱ्यांची संख्या पाहता उमेदवारांना रोजगाराची गरज नाही की उमेदवारच अपेक्षांना उतरत नाहीत हा संभ्रम आहे.