मोकाट गुन्हेगारांमुळेच गुन्ह्य़ांमध्ये वाढ, शनिवारी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन

नाशिक : गंभीर स्वरूपाचे दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांना तडीपार, सराईतांवर एमपीडीए आणि गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, अशी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या शहर पोलिसांच्या नजरेतून डीजे चालकांना अमानुष मारहाण, अत्याचार प्रकरणातील सराईत गुन्हेगार कसे सुटले? असा प्रश्न ग्रामीण पोलीस दलास पडला आहे. उपरोक्त घटना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडली असली तरी या प्रकरणातील सर्व संशयित हे शहरातील आहेत. त्यातील काहींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली असती तर पुढील गुन्ह्य़ांवर आपसूक नियंत्रण आले असते, याकडे लक्ष वेधले जात आहे.

सराईत गुन्हेगार संदेश काजळे याच्या वाढदिवसाची पार्टी भाजपशी संबंधित निखील पवार याच्या दरी-मातोरी येथील शेतातील घरात साजरी झाली. यावेळी काजळेचे साथीदार उपस्थित होते. रात्रभर वादन झाल्यानंतर टोळक्याने पहाटे ध्वनीची यंत्रणा चांगली नव्हती, आवाज चांगला नव्हता, अशी कारणे सांगत वाद्य वाजविणाऱ्यांना अमानुष मारहाण केली. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होऊ नये म्हणून आमदारासह अनेक पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. हा दबाव झुगारत पोलिसांनी कारवाई केली. एका संशयिताला भाजप आमदाराच्या घरातून ताब्यात घेतले गेले.

या प्रकरणी पोलिसांनी प्रितेश काजळे (विजयनगर, सिडको), निखिल महेंद्र पवार (अशोकस्तंभ), संदेश दिलीप वाघ (आरटीओ कॉर्नर), अभिषेक ज्ञानेश्वर शिरसाठ (सिडको), रोहित जगदीश डोळस (सिडको), संदीप ऊर्फ सँडी अजबराव माळोकर (सिडको) या सहा संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित संदेश काजळे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अटकेत असणाऱ्या सहा संशयितांवर दाखल गुन्ह्य़ांची माहिती ग्रामीणकडून शहर पोलिसांकडे मागण्यात आली आहे. संदेश काजळेच्या टोळीकडून अपहरण, मारहाण, चित्रीकरण करून वसुलीचे काम केले जात असल्याची चर्चा आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईत अपयश?

दरी-मातोरीच्या घटनेने शहरातील गुन्हेगारांकडून ग्रामीण भागात घातला जाणारा धुडगूस पुन्हा समोर आला. शहराच्या आसपासचा बहुतांश परिसर शेतीचा आहे. परिसरात शेतातील घरे (फार्म हाऊस), हॉटेल, रिसॉर्ट यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील पोलीस ठाण्याची हद्द विस्तीर्ण असल्याने प्रत्येक ठिकाणी नियमित लक्ष देणे अवघड असते. दरी-मातोरीच्या प्रकरणातील सर्व संशयित शहरातील आहेत. त्यातील संदेश काजळे या फरार मुख्य संशयितावर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी लूट, मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगारांवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली असती तर असे गुन्हे घडले नसते, अशी प्रतिक्रिया ग्रामीण पोलीस दलातून उमटत आहे.

गुंडगिरीविरोधात सर्वपक्षीयांची एकजूट

दरी-मातोरी येथे डीजे चालकांना बेदम मारहाण करून गुंडांच्या टोळीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घृणास्पद कृत्याच्या निषेधार्थ १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. संशयितांना राजकीय वरदहस्त देणाऱ्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी मोर्चाद्वारे केली जाणार असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीनंतर नेत्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली. पीडितांना विशेष खोली द्यावी, बाहेरील कोणत्याही व्यक्तीला त्यांना भेटू देऊ नये, पोलीस संरक्षण द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

वर्षभरात १३६ गुन्हेगार तडीपार

शहर पोलिसांनी २०१९ या वर्षांत गुन्हेगारांवर केलेल्या कठोर कारवाईची माहिती वार्षिक अहवालात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २०१९ वर्षांत तडीपारीचे एकूण २०२ प्रस्ताव सादर होऊन १३६ प्रकरणात अंतिम आदेश झाले. २०१८ च्या तुलनेत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रमाण २८ ने वाढल्याचे पोलिसांनी म्हटले होते. एमपीडीएअंतर्गत १३ प्रस्ताव सादर होऊन १२ प्रकरणात अंतिम आदेश तर मोक्कांतर्गत चार प्रस्ताव सादर होऊन एका प्रकरणात अंतिम आदेश झाल्याची आकडेवारी आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांवर तडिपारीची कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. या स्थितीत दरी-मातोरी येथील संशयित कारवाईच्या कचाटय़ातून कसे सुटले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  शहर पोलिसांवर कोणा मोठय़ा व्यक्तीचा दबाव असल्याचेही म्हटले जात आहे.