हिंदू जनजागृती समितीचा आरोप
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचे दर्शन घेण्याबाबत देवस्थानने स्त्री-पुरूष मतभेद केलेला नाही. याबाबत परंपरा आणि रुढी जाणून न घेता भूमाता ब्रिगेडच्यावतीने केवळ राजकीय स्वार्थासाठी प्रथा मोडण्याचा अट्टाहास करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट यांनी केला.
ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी २०१२ मध्ये पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढविली होती. देसाई यांच्या फेसबूकवर काँग्रेसच्या नेत्यांनी सत्कार केल्याची छायाचित्रे आहेत. ‘आप’च्या कार्यक्रमांतील काही छायाचित्रे आहेत. देसाई या भाविक नसून केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्या हिंदू धर्मविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप धनवट यांनी केला. शनि शिंगणापूर येथील धार्मिक प्रथांच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या षडयंत्राला बळी न पडता स्थानिक ग्रामस्थांच्या शेकडो वर्षांंच्या परंपरांचे जतन करण्यात पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच याविषयी माध्यमांतून संत महतांना मंदिराचे नियम आणि घालून दिलेल्या पध्दती याबद्दल परिपूर्ण माहिती न देता उपरोक्त प्रकरणात त्यांची भूमिका विचारली जात आहे. या प्रकारे त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. शनिशिंगणापूर येथील महिलांचे दर्शन हा विषय कर्मकांडाशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा याकडे त्यांनी लक्ष वेधले. देसाई यांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी हा खोटा प्रचार केला आहे. महिला आजही चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेत असल्याचा दावा धनवट यांनी केला.

नाशिकमध्ये सभा
हिंदू जनजागृती समितीच्यावतीने राष्ट्र आणि धर्म यावरील संकटांची जाणीव व्हावी तसेच हिंदू राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने नाशिक येथे ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आर. पी. विद्यालय मैदानावर हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सनातन संस्थेसह अन्य हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय हेही सहभागी होणार आहेत. सभेच्या वातावरण निर्मितीसाठी २९ जानेवारी सायंकाळी ४ वाजता काळाराम मंदिरापासून प्रसार फेरी काढण्यात येणार आहे.