News Flash

‘त्र्यंबकेश्वर’च्या गाभाऱ्यात प्रवेशापासून भूमाता ब्रिगेडला रोखणार

केवळ प्रसिध्दी आणि प्रशासन व स्थानिक नागरिकांना वेठीस धरण्यासाठी ब्रिगेड हे करते.

हिंदू जनजागृती समितीचा इशारा

शनि शिंगणापूर येथील शनीदेवाच्या चौथऱ्यावर जाण्याचा अट्टाहास करणाऱ्या भूमाता ब्रिगेडला ज्याप्रमाणे रोखण्यात आले, त्याचप्रमाणे ७ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या विशेष पर्वाच्या दिवशी येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडला हिंदुत्ववादी संघटना रोखतील, असे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे.

प्रत्येक देवस्थानच्या निरनिराळ्या प्रथा-परंपरा असतात. त्याप्रमाणे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू महिला व पुरूष यांना प्रवेश आहे. मात्र, गर्भगृहात केवळ सोवळे नसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरूषांनाच प्रवेश आहे. ही शेकडो वर्षांची परंपरा असून या ठिकाणी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे आदी महिलांनी दर्शन घेताना प्रथा परंपरांचे पालन केल्याचा दाखला समितीने दिला आहे. भूमाता ब्रिगेडला कोणतेही काम राहिलेले नाही. त्यांच्या आंदोलनाचा शनी शिंगणापूर येथे फज्जा उडाल्यानंतर त्यांची नजर त्र्यंबकेश्वर येथे असल्याचे समितीचे संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.

केवळ प्रसिध्दी आणि प्रशासन व स्थानिक नागरिकांना वेठीस धरण्यासाठी ब्रिगेड हे करते. त्र्यंबकेश्वर गावात वास्तव्यास असणाऱ्या १२०० महिलांनी ही प्रथा मोडू नये, म्हणून प्रशासनाला निवेदन दिले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात. अशावेळी ब्रिगेडच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस व प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ब्रिगेडच्या महिलांना नाशिक जिल्हा बंदी जाहीर करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 1:00 am

Web Title: hindu janajagruti samiti will stop bhumata brigade woman from entering to trimbakeshwar temple
टॅग : Trimbakeshwar Temple
Next Stories
1 शिर्डीच्या विमानतळाची यशस्वी चाचणी
2 पाटबंधारेच्या विश्रामगृहाचे पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात रूपांतर
3 सिग्नल, भुयारी मार्ग व विस्तारीकरण
Just Now!
X