हिंदू जनजागृती समितीचा आरोप
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांना करण्यात आलेली अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करत केलेली अन्याय्य कारवाई आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करण्याचे पुरोगाम्यांचे षडयंत्र असल्याचेही समितीने म्हटले आहे.
समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ चारूदत्त पिंगळे यांनी येथे भूमिका मांडताना हिंदुत्ववादी संघटना सनातनच्या पाठीशी असल्याचे नमूद केले. यावेळी समितीचे राज्य संघटनक सुनील घनवट, सनातन संस्थेचे सेवक नंदकुमार जाधव, श्रीराम सेनेचे मारूती सुतार, आदी उपस्थित होते. जाधव यांनी गायकवाड यांच्यावर अद्याप आरोपपत्र दाखल झाले नसतांना पुरोगाम्यांनी राईचा पर्वत उभा करून संस्थेवर बंदी घालण्याची केलेली मागणी अन्यायकारक असल्याचे सांगितले.
काही पुरोगामी संघटनांच्या अपप्रकारांचा सनातनने भांडाफोड केल्याने त्या एकत्रितपणे सनातनला लक्ष्य करू पाहत आहेत. संस्थेचे कार्य समजून न घेता त्यावर टीका करणे म्हणजे हिंदुत्वाचे खच्चीकरण करण्याचा पुरोगाम्यांचा प्रयत्न असून आम्ही तो सफल होऊ देणार नाही, असे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, सनातनवर बंदीची मागणी करणाऱ्यांचा संत आणि हिंदुत्वत्वादी संघटनांनी संत संमेलनात पत्राद्वारे निषेध केला आहे. जगद्गुरू रामानुजाचार्य, महामंडलेश्वर, महंत, वारकरी, संत यांचा सनातनला जाहीर पािठबा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.