कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणे अयोग्य असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांच्या प्रवेशास कडाडून विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रयत्नांना धक्का लागल्याचे अधोरेखित झाले आहे. अलीकडेच महाशिवरात्रीच्या दिवशी या मुद्दय़ावरून होऊ घातलेला संभाव्य वादविवाद टळला होता. देवस्थानच्या प्रथा-परंपरांचे संदर्भ देऊन या मंदिराच्या गाभाऱ्यातील महिलांच्या प्रवेशावर आक्षेप घेणाऱ्या हिंदू संघटना आरएसएसच्या स्पष्टीकरणानंतर काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
शनिशिंगणापूर येथील शनीदेवाच्या चौथऱ्यावर तसेच बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश देण्याचा विषय गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. अलीकडेच महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडने दिल्यानंतर सर्व हिंदुत्ववादी संघटना हिंदू जनजागृती समितीच्या छताखाली एकत्र आल्या. शनिशिंगणापूर येथे या ब्रिगेडला हिंदुत्ववादी संघटनांनी जसे राखले, तसेच त्र्यंबक येथेही रोखले जाईल, असा इशारा या समितीने दिला होता.
प्रत्येक देवस्थानच्या निरनिराळ्या प्रथा-परंपरा असतात. त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू महिला व पुरुष यांना प्रवेश आहे. मात्र, गर्भगृहात केवळ सोवळे नसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरुषांनाच प्रवेश आहे. ही शेकडो वर्षांची परंपरा असून या ठिकाणी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे आदी महिलांनी दर्शन घेताना प्रथा परंपरांचे पालन केल्याचा दाखला समितीने दिला होता. भूमाता ब्रिगेडवर टीकास्त्र सोडत समितीच्या कार्यकर्त्यांनी उपरोक्त दिवशी त्र्यंबकेश्वर येथे ठाण मांडून ब्रिगेडच्या महिलांना रोखण्याची सज्जता केली होती. स्थानिक महिलांनी प्रथा परंपरेचे पालन करण्याचे आवाहन करत हिंदू संघटनांना साथ दिली.
महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याने पोलीस यंत्रणेने ब्रिगेडच्या महिला आणि हिंदुत्ववादी संघटना समोरासमोर येणार नाहीत याची दक्षता घेतली. ब्रिगेडच्या महिलांना नाशिक-पुणे महामार्गावर रोखून धरण्यात आले. ब्रिगेडने पंधरा दिवसांत या बाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महिलांच्या प्रवेशाबाबत त्र्यंबकेश्वर देवस्थानने समितीची स्थापना करून विचारविनिमय सुरू केला आहे. काही विश्वस्तांचा महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यास आक्षेप आहे. त्यासाठी पेशवेकालीन नियमावलीचा संदर्भ दिला जातो. हिंदुत्ववादी संघटनाही प्रथा-परंपरांचे समर्थन करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या घडामोडींबाबत मत प्रथमच जाहीरपणे पुढे आले.
मंदिर व्यवस्थापनाकडून अयोग्य प्रथा पाळल्या जात असून महिलांना मंदिरात प्रवेश देण्यापासून ठाम सहमतीचा अभाव दिसून येतो. संवेदनशील प्रश्न आंदोलनाऐवजी चर्चात्मक मार्गातून सोडविले जावेत. कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणे योग्य नसल्याचे संघाने म्हटले आहे. संघाकडून अनिष्ट प्रथा परंपरावर बोट ठेवले गेल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांची अडचण झाल्याचे दिसत आहे. या एकंदर स्थितीत त्र्यंबकेश्वरबाबत या संघटनांची नेमकी काय भूमिका राहणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.