News Flash

दिवाळीत शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक वस्तूंचा खजिना उपलब्ध

दिवाळीच्या सुट्टीत ‘किल्ले बनवू या’ स्पर्धेतून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे प्रदर्शन

शिवकालीन नाणी.. युद्धात किंवा स्वसंरक्षणासाठी वापरण्यात आलेली लहान-मोठी आयुधे.. शिवकालीन बांधकामात वापरण्यात आलेल्या विटा आणि दगड.. यासह अन्य ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शनात पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या खजिन्यात आता १५० वर्षांपूर्वीच्या बखरचाही समावेश झाला असून दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसह इतिहासप्रेमींना हे प्रदर्शन पाहता येईल.

किल्ल्यांच्या संवर्धनार्थ काम करणाऱ्या दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे आजपर्यंत ३० हून अधिक किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या अनास्थेचे दर्शन घडले. मात्र त्याच वेळी किल्ला परिसरात इतिहासाचे साक्षीदार ठरलेल्या काही चल वस्तू आजही भग्नावस्थेत त्या ठिकाणी विखुरल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिवरायांचा इतिहास पानातून समजाविण्यापेक्षा या अबोल वस्तूंच्या मदतीने शिकवला तर तो अधिक रोचक व आकलनास सोपा राहील या हेतूने प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी वस्तुसंग्रहाची संकल्पना मांडली. शहरातील विद्यालये, महाविद्यालयांत हे प्रदर्शन भरविण्यात येईल. तसेच गड-किल्ल्यांवरील मोहिमेत हे प्रदर्शन ग्रामस्थांसाठी सादर केले जाईल. प्रदर्शनात दुर्मीळ शिवकालीन वस्तू, पुस्तके, नाणी, दगड, अवजारे यांसह अन्य काही दुर्मीळ वस्तूंचे संकलन करून त्याचा संग्रह करण्यात येत आहे. दिवाळीच्या सुट्टीत ‘किल्ले बनवू या’ स्पर्धेतून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. या उपक्रमात निसर्गप्रेमी प्रमिला पाटील यांनी त्यांच्याकडे परंपरेने चालत आलेली दीडशे वर्षांपूर्वीची दुर्मीळ बखर भेट देत सदिच्छा व्यक्त केली. ही बखर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिली असावी असा अंदाज आहे. मूळ हस्तलिखितावरून हे मुद्रण त्या काळी केले गेले असावे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर माहिती आहे. दुर्मीळ बखरीपोटी मोठी रक्कम मिळत असतानाही पाटील यांनी ती इतिहासप्रेमींसाठी उपलब्ध केली. त्यात छत्रपती घराणे, बडोद्याचे घराणे यांची माहिती आहे, तसेच शेवटच्या पेशव्याचे झालेले हालही या बखरीत वाचावयास मिळतात. बखरीचे ३१ भाग आहेत. शिवकालीन वस्तू, पुस्तके, नाणी, अवजारे किंवा इतर वस्तू असतील तर त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी संस्थेचे सागर बनकर, भीमराव राजोळे, आशीष बनकर, दर्शन घुगे, आकाश बनकर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 4:17 am

Web Title: historical articles exhibition from durgasanvardhan foundation
Next Stories
1 दिवाळी बाजारपेठेवर ‘मेक इन इंडिया’ची छाप
2 नाशिक विभागातून भेसळयुक्त ३५ हजार किलो साठा जप्त
3 शिक्षणाची नैतिक मूल्य जोपासा
Just Now!
X