ज्येष्ठांसाठी वाहन व्यवस्था; पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

उन्हाळी सुटी असो की, सलग लागून येणाऱ्या सुटय़ा असो.. भटकंती करणाऱ्यांसाठी निमित्त पुरेसे ठरते. मात्र अपेक्षित वेळ आणि खिशाचा अंदाज घेत जायचे कुठे असा प्रश्न पडणाऱ्या पर्यटनप्रेमींना ‘हॉलिडे कार्निव्हल’च्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. ज्येष्ठांच्या समूहाला वाहनाची विशेष व्यवस्था करण्यात आली. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) संस्थेच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल यांच्या हस्ते होईल.

गंगापूर रस्त्यावरील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात ६ ते ८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाची माहिती तानचे किरण भालेराव यांनी दिली. सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत महोत्सव सुरू राहणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास महापौर अशोक मुर्तडक, आ. देवयानी फरांदे प्रमुख पाहुणे म्हणन उपस्थित राहणार आहेत. यावेळी पर्यटनप्रेमींना एक दिवसाच्या नाशिक दर्शनासह देश परदेशात विविध ठिकाणी कसे जाता येईल, त्यासाठी अपेक्षित खर्च आदी माहिती देणारे वेगवेगळ्या पर्यटन कंपन्यांचे ४४ स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. पर्यटकांना एकाच छताखाली वेगवेगळे पर्याय खुले होणार आहेत. याच ठिकाणी आगाऊ नोंदणी केल्यास विशेष सवलत मिळणार आहे. या शिवाय इतर कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास पर्यटकांना करता येईल. साहस तसेच उत्तर-पूर्व भारतातील पर्यटन हे खास कक्ष यावेळी उभारण्यात येणार आहेत. साहस कक्षात उन्हाळी सुट्टीत होणाऱ्या वेगवेगळ्या ट्रेकिंग शिबिरांची माहिती दिली जाणार असून उत्तर-पूर्वेकडील पर्यटनात त्रिपुरा, नागालँड, आसाम यासह त्याच परिसरातील इतर पर्यटन स्थळे यांची माहिती दिली जाणार आहे. या महोत्सवास ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ यांना यायचे असेल तर दहाहून अधिक व्यक्तींचा समूह जर या ठिकाणी येण्यास इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी खास वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.

या शिवाय उद्घाटन सत्रानंतर प्रत्येक तासाला खास ‘भाग्यवंत सोडत’ जाहीर होणार असून यामध्ये प्रवासी बॅगपासून एकदिवसीय मोफत सहल, अ‍ॅडव्हेंचर तिकिटे, मोफत निवास व्यवस्था अशी विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. नाशिककरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तानने केले आहे. अधिक माहितीसाठी ९६८९० ३८८८० या क्रमांकावर संपर्क साधावा.