वर्गशिक्षक हरिश्चंद्र दाभाडे यांचा पुढाकार

इगतपुरी : शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांप्रति किती आस्था असावी, त्याचे उदाहरण तालुक्यातील पेहरेवाडी येथे घडले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी सविता खडकेचे ऑक्टोबर २०१६ रोजी राहत्या घरी रात्री झोपेत सर्पदंशाने निधन झाले. या गुणवंत विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे शाळेतील शिक्षक कमालीचे अस्वस्थ झाले. सविताचे घर पक्के असते तर अशी घटना घडली नसती, असे शिक्षकांना वाटले.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत इगतपुरी शिक्षक समितीचे पदाधिकारी आणि सविताचे वर्गशिक्षक हरिश्चंद्र दाभाडे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सतत पाठपुरावा करून सविताच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑगस्ट २०१८ मध्ये ७५ हजार रुपये मिळवून दिले होते.

पक्के घर नसल्यामुळेच सविताचा मृत्यू झाल्याची रुखरुख त्यांच्या मनाला सतत लागून होती. त्यामुळे त्यांनी सविताच्या पालकांना पक्के घर बांधून देण्याचा संकल्प केला. सविताच्या पालकाचे घर कुडा-मातीचे होते. त्या पालकांना पक्के घर हवे म्हणून दाभाडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन शासकीय मदत तसेच स्वखर्चातून टुमदार घर बांधून दिले.  सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या मित्रमंडळींकडूनही त्यांच्या कार्यास मदत मिळाली. त्यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. त्यामुळे उपक्रमशील शिक्षक असलेल्या दाभाडे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षक वर्गाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मी सतत दोन वर्षे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी चकरा मारून मोठय़ा कष्टाने मयत विद्यार्थिनीच्या पालकांना मदत मिळवून दिली तसेच मिळालेली मदत इतरत्र खर्च होऊ नये म्हणून मदतीच्या रकमेत सामाजिक बांधिलकीतून स्वत: मोठी रक्कम त्यात टाकून मयत विद्यार्थिनीच्या पालकांना घर बांधून दिले. घराच्या रूपाने मयत मुलीच्या आठवणी कायम जाग्या राहतील एवढीच अपेक्षा.

-हरिश्चंद्र दाभाडे (मुख्याध्यापक)