करोना संकटातही हुक्का पार्लर सुरू ; १८ जणांविरुद्ध कारवाई

नाशिक : शहरात लपूनछपून हुक्का पार्लर सुरू असून अनेक तरुण  त्याच्या आहारी जात असल्याची बाब मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाली आहे. साईनाथ चौफुलीजवळील इमारतीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. दोन चालकांसह प्रतिबंधित हुक्का सेवन करणारे १६ अशा एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले. हुक्का सेवन करणाऱ्यांमध्ये युवावर्गाचा अधिक्याने समावेश आहे.

हुक्का पार्लरच्या विळख्यात युवा पिढी सापडत आहे. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी शहरात चोरून सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे उपरोक्त कारवाई करण्यात आली.

उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. साईनाथ चौफुलीजवळ सातारी मिसळचा फलक लागलेली इमारत आहे. तिसऱ्या मजल्यावर अजिज मेन्शन कॅफे येथे अल्ताफ इस्माईल सय्यद आणि शाहीद दस्तगीर खान हे हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे गुन्हे शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री संबंधित कॅफेवर छापा टाकला. त्यावेळी विनापरवानगी हुक्का पार्लर सुरू असल्याचे उघड झाले. बंदी असणारी सुंगधी तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पिण्याचे साहित्य सेवनाकरिता उपलब्ध करून दिले जात होते. करोना काळात सार्वजनिक वा खासगी ठिकाणी गर्दी करू नये म्हणून शासकीय यंत्रणांकडून वारंवार आवाहन केले जात आहे.

कॅफेत हुक्का सेवन करण्यासाठी १६ जण एकत्र जमलेले होते. यात तरुण मुला-मुलींचा अधिक्याने समावेश होता. यावेळी मालकासह हुक्का सेवन करणाऱ्या एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे विजय ढमाळ यांनी सांगितले. कॅफेमधील हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी अल्ताफ ईस्माईल सय्यद आणि शाहीद दस्तगीर खान यांच्यासह अन्य १६ जणांविरुध्द साथरोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुक्का सेवन करणाऱ्यांमध्ये तरूण-तरुणींचा अधिक्याने समावेश आहे. गर्दीत करोनाचा संसर्ग वेगाने पसरतो. यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी टाळण्यासाठी पोलीस, महापालिका यंत्रणा प्रयत्नरत आहेत. हुक्का पार्लरमध्ये गर्दीचा नियम खुंटीवर टांगला गेला. करोनाचा संसर्ग पसरण्याची संभव असतांना ते सुरू ठेवले गेले. हुक्का सेवन करतांना गर्दी करणाऱ्यांवर कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.