News Flash

पोषक वातावरणामुळे द्राक्ष निर्यातदारांना आशा

मागील हंगामात एक लाख ९२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती.

पोषक वातावरणामुळे द्राक्ष निर्यातदारांना आशा

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : करोना टाळेबंदीत मागील हंगामाच्या अखेरीस प्रचंड आर्थिक नुकसान सोसणाऱ्या द्राक्ष व्यवसायाला आगामी हंगामात बरीच आशा असली तरी त्या संकटाचे मळभ अद्याप दूर झालेले नाही. ‘कसमादे’ भागात हंगामपूर्व द्राक्षांच्या काढणीस सुरुवात झाली असून जागेवर किलोला ७० ते ७५ रुपयांचा भाव मिळत आहे. निर्यातक्षम द्राक्षांचे दर त्यापेक्षा अधिक आहे. मागील हंगामात एक लाख ९२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. सध्या निर्यातीला पोषक वातावरण असून माल परदेशातील बाजारपेठेत पोहचण्यात कुठलाही अवरोध न आल्यास या हंगामात अधिक निर्यात होण्याची आशा द्राक्ष निर्यातदार संघटनेला आहे.

करोनामुळे फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान देशासह जगभरात टाळेबंदी लागू झाली आणि ऐन भरास आलेला द्राक्ष व्यवसाय पुरता कोलमडला होता. संचारबंदीमुळे वाहने परप्रांतात जाऊ शकत नव्हती. व्यापारी, मजूर गावी निघून गेले. जिल्ह्य़ात ३० ते ३५ टक्के बागांची काढणी बाकी असताना ही स्थिती उद्भवली. इतका माल शिल्लक राहिला की, बेदाणे निर्मितीसाठी देखील तो कोणी घेत नव्हते. युरोपासह जगभरातील देशांच्या सीमा बंद झाल्याचा मोठा फटका निर्यातीला बसला. नाशिकची द्राक्षे युरोपसह जगभरात जातात. सीमा बंद झाल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर, द्राक्षांच्या नव्या हंगामाला सुरुवात होत आहे. कसमादे भागातील हंगामपूर्व द्राक्षे बांगलादेशसह देशांतर्गत बाजारात पाठविली जात आहेत. बागलाण, देवळा, मालेगाव भागात हंगामपूर्व द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. नाताळात जगभरात द्राक्षे पुरविणारा हा एकमेव परिसर. निर्यातक्षम द्राक्षांना किलोला १०० किं वा त्याहून अधिकचा दर मिळतो. यंदाचा हंगाम त्यास अपवाद राहिला नाही. देशांतर्गत बाजारात ७० ते ७५ रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याचे सटाणा तालुक्यातील धर्मराज फाम्र्सचे कृष्णा भामरे यांनी सांगितले. हंगामपूर्व द्राक्षांवर नैसर्गिक आपत्तीचे सावट असते. हा धोका कमी करण्यासाठी भामरे यांच्यासह अनेक उत्पादकांनी द्राक्ष बाग छाटणीचे वेळापत्रक महिनाभर पुढे नेले. त्याचाही लाभ उत्पादकांना झाल्याचे चित्र आहे.

ज्यांनी वेळापत्रकात बदल केले नाहीत, त्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. प्रारंभी डावणीचा प्रादुर्भाव झाला. घडांची कुज झाली. लवकर छाटणी करणाऱ्या बागांचे नुकसान झाल्याचे बागलाणचे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी मान्य केले. त्या बागा वगळता उर्वरित क्षेत्रात चांगले उत्पादन होईल असे ते सांगतात. कसमादे भागात छाटणी लवकर म्हणजे जून, जुलै, ऑगस्टमध्ये केली जाते. निफाड, नाशिक, दिंडोरी, सिन्नर आदी परिसरात त्यापेक्षा उशिरा म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये छाटणी होते. कसमादेतील द्राक्षे लवकर म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापासून बाजारात येऊ लागतात. डिसेंबपर्यंत हा हंगाम चालतो. या काळात जगात कुठल्याही भागातील द्राक्षे नसतात. स्पर्धा नसल्याने उत्पादकांना चांगला दर मिळतो. जिल्ह्य़ातील उर्वरित भागात जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू होतो. गेल्या वेळी हंगामपूर्व द्राक्षांना अवकाळीचा तडाखा बसला होता. फेब्रुवारी, मार्चमधील टाळेबंदीत उर्वरित भागातील द्राक्ष उत्पादकांचे गणित विस्कटले होते. निर्यातक्षम द्राक्षांसाठी बागांवर मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागतो. अधिक्याने निर्यात झाल्यास देशांतर्गत बाजारात चांगले दर मिळतात.

द्राक्षाच्या निर्यातीसाठी सध्या चांगली स्थिती आहे. कसमादे भागातील निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलोस १०० रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षी करोनाच्या टाळेबंदीमुळे अखेरच्या टप्प्यात निर्यातीत अडचणी आल्या. तेव्हा एक लाख ९२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. आधीच्या हंगामाच्या तुलनेत निर्यात कमी होती. करोनाची धास्ती अजूनही दूर झालेली नाही. आर्मिनिया-अजरबैजान युद्धाचा प्रभाव माल वाहतुकीच्या सागरी मार्गावर पडू शकतो. सर्व काही सुरळीत राहिल्यास द्राक्ष निर्यातीत वाढ होऊ शकेल.

– जगन्नाथ खापरे , अध्यक्ष, द्राक्ष निर्यातदार संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 12:41 am

Web Title: hope for grape exporters due to positive atmosphere zws 70
Next Stories
1 जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढली
2 करोनाच्या अपुऱ्या उपायांमुळे राज्यात हजारो बळी
3 कृषी योजनांच्या प्रगतीची पाहणी थेट शेतीच्या बांधापर्यंत
Just Now!
X