News Flash

लोकसहभागातून मालेगावकरांचा पुढाकार

कुंपणाच्या जीर्ण भिंतीला तेथील रहिवाशांनी आकर्षक रंगरंगोटी करत निरनिराळी चित्रे साकारल्यामुळे या भिंतीचे सौंदर्य खुलून गेले आहे.

मालेगाव शहरातील लोढा भवन परिसरातील महापालिका रुग्णालयाच्या भिंतीचे सौंदर्य स्थानिक नागरिकांनी असे खुलवले आहे.

रुग्णालयाच्या कुंपण भिंतीचे सौंदर्य आता खुलणार..

लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव : प्रत्येक गोष्टीबद्दल शासकीय यंत्रणांवर विसंबून राहिल्यास पदरी निराशा पडण्याचा किंवा बहुप्रतीक्षा झेलावी लागण्याचा अनुभव अनेकदा येत असतो. परंतु,असे विसंबून न रहाता लोकसहभागातून एखादे कार्य हाती घेतले तर त्यातून अफलातून अशी निर्मिती साधता येते याचा आदर्श वस्तूपाठ शहरातील गजबजलेल्या लोढा भवन या भागातील रहिवाशांनी घालून दिला आहे. वस्तीला लागून असलेल्या महापालिका रुग्णालयाच्या खंगत चाललेल्या कुंपणाच्या जीर्ण भिंतीला तेथील रहिवाशांनी आकर्षक रंगरंगोटी करत निरनिराळी चित्रे साकारल्यामुळे या भिंतीचे सौंदर्य खुलून गेले आहे. लोकसहभागातून झालेल्या या कामामुळे ‘काय होते आणि काय झाले‘ याची साक्ष पटत असून लोढा भवन वस्तीच्या या आगळ्यावेगळ्या कार्याची शहरात प्रशंसा होत आहे.

लोढा भवन हा शहरातील उच्चभ्रू लोकांच्या वस्तीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या वस्तीच्या एका बाजूला लागून असलेल्या रस्त्याच्या पलीकडे सटाणा रोड रुग्णालयाच्या कु ंपणाची भिंत आहे. महापालिकेच्या रुग्णालयाची ही इमारत तसेच कुंपणाची भिंत बांधून आता बरीच वर्षे उलटली आहेत. बांधल्यापासून कधीच या भिंतीला रंगरंगोटी केली गेलेली नव्हती. पावसाच्या पाण्यामुळे सादळलेल्या या भिंतीवरील शेवाळ, जागोजागी उगवलेले गवत, तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनी थुंकून केलेले विद्रूपीकरण या साऱ्यांमुळे या जीर्ण भिंतीची अक्षरश: दुरवस्था झाली होती. एका बाजूला टोलेजंग इमारतींमधील उच्चभ्रूंचा रहिवास आणि वस्तीलगत असलेल्या ३०० मीटर लांब आणि दोन मीटर उंचीच्या या भिंतीची झालेली दुर्दशा ही कुणालाही खटकावी अशीच बाब. रुग्णालयाच्या इमारतीत आता राज्य शासनाचे महिला-बाल रुग्णालय सुरू झाले आहे. रुग्णालयीन प्रशासन तसेच महापालिके कडून या भिंतीच्या दूरावस्थेबद्दल कमालीची उदासिनता दर्शवली जात असल्याची प्रचिती स्थानिकांनी वेळोवेळी घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर, स्थानिकांनीच या भिंतीचे रूपडे पालटून आकर्षक करण्याचा संकल्प केला. वास्तुविशारद स्नेहा लोढा, सिध्दार्थ लोढा, चार्टर्ड अकाउटंट भूषण छाजेड आणि प्रयाग नहार या तरुणांनी मांडलेली ही कल्पना अन्य सर्वांनी उचलून धरली आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.

जवळपास २५ स्थानिक तरुण, तरुणींचे मोठय़ा आवडीने श्रमदान सुरू झाले. सकाळी सहा ते ११ आणि सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत सतत १० दिवस हे काम चालले. प्रारंभी पाण्याने स्वच्छ धुवून ही भिंत घासून घेण्यात आली. त्यानंतर रंगरंगोटी करण्यात येऊन भिंतींवर जागोजागी सौंदर्य खुलविणारी तसेच प्रबोधनात्मक अशी निरनिराळी चित्रे साकारण्यात आली. सप्त रंगाच्या आकर्षक छटांचा मिलाफ साधत या भित्तीचित्रांना बोलके करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला. या कामासाठी रंग आणि अन्य साहित्यासाठी लागलेला सुमारे ७५ हजारांचा खर्च स्थानिकांच्या लोकवर्गणीतून भागविण्यात आला. श्रमदान करणाऱ्या तरुण-तरुणींना कॉलनीतील रहिवाशांनी चहा, नाश्ताची रोजची सोय उपलब्ध करून दिली होती. ‘माझी कॉलनी, माझी जबाबदारी‘ या जाणिवेतून सर्वच स्थानिकांनी या कामात सहभाग नोंदवला. ज्येष्ठांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावली. या भिंतीच्या पालटलेल्या आनंददायी रूपडय़ामुळे ‘सेल्फी’ काढणाऱ्यांची आता तेथे गर्दी होऊ  लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 1:15 am

Web Title: hospital fence wall beautification dd70
Next Stories
1 ग्राहक पंचायत की राजकीय संघटना?
2 पल्स पोलिओ मोहीम आव्हानात्मक
3 एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण
Just Now!
X